Monday, November 23, 2020

 

पदवीधर मतदानाच्या केंद्रावर

कोविड-19 च्या खबरदारीसाठी असतील कर्मचारी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 


नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज जिल्ह्यात 123 मतदान केंद्र 

नांदेड (जिमाका) दि. 23 :-  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक मतदानासाठी नांदेड जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीने सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्वच्यासर्व 123 मतदान केंद्रावर कोविड-19 अंतर्गत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी स्वतंत्र 3 आरोग्य कर्मचारी कार्यरत असतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले. प्रत्येक मंडळ निहाय ग्रामीण भागात मतदान केंद्र असून त्याठिकाणी कोविड-19 आजार सदृश्य अथवा कोणाला ताप व इतर आजाराची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यासही त्यांनी सांगितले आहे. 

कोविड-19 च्या या काळातील निवडणूक ही इतर निवडणुकीपेक्षा आरोग्याच्यादृष्टिने जिल्हा प्रशासनासाठी आव्हानात्मक आहे. अशा या काळात आरोग्याची संपूर्ण काळजी घेण्याच्या उद्देशाने प्रत्येक बुथ हे सॅनिटाइज, निर्जंतुकीकरण करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. कोविड-19 च्या प्राथमिक चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या थर्मामीटर, ऑक्सीमीटर हे आवश्यक त्याठिकाणी देण्यात आले आहेत. मतदान केंद्रात जाण्याअगोदरच प्रत्येकाचे तापमान तपासले जाणार असून पदवीधर मतदारांनी योग्य ती खबरदारी घेऊन आपला मतदानाचा हक्क व कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

जिल्ह्यातील मतदारांसाठी मतदान सुलभ करता यावे यादृष्टीने मतदान केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण 123 केंद्रावर मतदान पार पडेल यासाठी 907 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. या प्रक्रीयेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकाची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून प्राथमिक चाचणी केली जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

नांदेड जिल्ह्यात आज मतमोजणी लोकसभेसाठी 19 व विधानसभेच्या 165 उमेदवारांचे भविष्य ठरणार * प्रशासन सज्ज, विद्यापीठाच्या ज्ञानार्जन केंद्रात मतम...