वृत्त क्र. 1160
शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकासाठी पीकस्पर्धा
नांदेड दि. 4 डिसेंबर :- राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास नक्कीच मदत होईल. तसेच शेतकऱ्यांकडून अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून कृषि विभागामार्फत पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.
पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषिसहायक, कृषिपर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. रब्बी हंगाम 2024 साठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी.आर. कळसाईत यांनी केले आहे.
शासन निर्णया अन्वये रब्बी हंगाम 2024 मध्येही पिकस्पर्धा मागील वर्षाप्रमाणे तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषि विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकासाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
पिक स्पर्धेतील पिके
रब्बी पिके - ज्वारी, गहू, हरभरा करडई व जवस (एकूण 5 पिके)
पात्रता निकष
स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे, स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल, पीक स्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र -अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, 8-अ उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास),पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
रब्बी हंगामामध्ये पिकस्पर्धेची अर्ज दाखल करण्याची तारीख खालील प्रमाणे राहील. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस ३१ डिसेंबर. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांकाचे पीक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क
पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम ३०० रुपये राहील व आदीवासी गटासाठी रक्कम १५० रुपये राहील.
पिकस्पर्धा विजेत्यासाठी बक्षिस स्वरुप स्पर्धापातळी व सर्वसाधारण आणि आदिवासीगटासाठी बक्षिस रुपये पुढील प्रमाणे आहे. तालुका पातळीसाठी पहिले बक्षिस 5 हजार, दुसरे 3 हजार तर तिसरे 2 हजार आहे. जिल्हा पातळीसाठी पहिले बक्षिस 10 हजार, दुसरे 7 हजार तर तिसरे 5 हजार आहे. राज्य पातळीसाठी पहिले बक्षिस 50 हजार, दुसरे 40 हजार तर तिसरे 30 हजार आहे. याप्रमाणे आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment