Wednesday, September 25, 2024

वृत्त क्र. 866

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’चा शुभारंभ 

नांदेड दि. 25 सप्टेंबर : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार भारतातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘तंबाखू प्रतिबंधक केंद्र’ (TOBACCO CESSASION CENTER )  चा शुभारंभ केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते दूरदर्शी प्रणालीद्वारे करण्यात आला. 

त्याअनुषंगाने डॉ. शंकरराव चव्हान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड येथील दंतरोगशास्त्र बाह्यरुग्ण विभागात TCC केंद्राची  (ओ पी डी क्र. 126-A) अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि इतर सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थित सुरुवात करण्यात आली. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे सध्या भारतातील युवा पिढी दुर्धर आजाराच्या विळख्यात अडकत चालली आहे. सध्यस्थितीत दरवर्षी जगात 80 लाख मृत्यू तर भारतात 13.5 लाख मृत्यू हे केवळ तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होतात. ही मोठी सामाजिक समस्या बनली असून याचे दुष्परिणाम केवळ रुग्णापुरते मर्यादित नसून संपूर्ण कुटुंबावर परिणाम होत आहेत. त्यामुळे युवा पिढीला या व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी TCC च्या माध्यमातून तज्ञ मार्गदर्शन, समुपदेशन आणि जनजागृती करण्यासाठी केंद्रीय मंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण, भारत सरकार, जे.पी. नड्डा यांच्या पुढाकाराने या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला.  

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शालेय तसेच महाविद्यालयीन तरुणांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन हे विष प्राशन करण्यासारखे असून तंबाखू रुपी विषाची परीक्षा कुणीही करू नये असे आवाहन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले.  हे महाविद्यालय व रुग्णालय परिसर तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प  देखील त्यांनी केला.  कार्यक्रमाच्या प्रास्ताविक पर भाषणात बोलताना दंतरोग तज्ञ डॉ. अरुण नागरिक यांनी तंबाखू सेवनामुळे होणारे आजार, दुष्परिणाम, आणि सामाजिक व आर्थिक दुष्परिणाम यावर प्रकाश टाकला. 

या कार्यक्रमासाठी दंतरोग शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. भावना भगत,  जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. इस्माईल इनामदार, सहयोगी प्राध्यापक डॉ. रामभाऊ गाडेकर, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य  बालाजी नगराळे, TCC प्रमुख डॉ. सुशील येमले, डॉ. अनुराधा राऊत व इतर अधिकारी, कर्मचारी, आंतरवासिता विद्यार्थी, नर्सिंग विद्यार्थी, रुग्ण व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे तर आभार अर्जुन राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व निवासी डॉक्टर्स आणि समाजसेवा अधीक्षक संतोष मुंगल, राजरत्न केळकर, दंत तंत्रज्ञ कल्याण कुंडीकर आदींनी परिश्रम घेतले.

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 873 माहितीअधिकार प्रकरणात  तत्‍परता आवश्‍यक - डॉ.हाटकर  जिल्‍हाधिकारी कार्यालयात माहितीचा अधिकार दिन साजरा नांदेड दि. २७ सप्टें...