Tuesday, August 30, 2016

अवयवदानाचे परिवर्तन समाजात रुजविण्यासाठी
तरुणांनी संदेश दूत व्हावे - कुलगुरु डॅा. विद्यासागर
नांदेड शहरात महा-अवयदानात अभियानात भव्य जनजागरण फेरी

नांदेड, दि. 30 - मृत व्यक्तीलाही अवयदानामुळे पुढे अनेक व्यक्तींमध्ये देहरुपी उरता येते. त्यासाठी अवयवदानाचे परिवर्तन समाजात रुजविण्यासाठी तरुणांना संदेशदूत व्हावे लागेल, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. पंडीत विद्यासागर यांनी आज येथे केले. महा-अवयवदान अभियानांतर्गत आयोजित भव्य जनजागरण फेरीच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे समारोप समारंभ झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर महा-अवयवदान अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीचे सहअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, अभियानाच्या समन्वय अधिकारी तथा डॅा. शंकरराव चव्हाण  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॅा. काननबाला येळीकर, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा  शल्यचिकीत्सक डॅा. विजय कंदेवाड, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. भास्कर श्यामकुंवर, आयएमए-नांदेडचे अध्यक्ष डॅा. संजय कदम, निमा-नांदेडचे अध्यक्ष डॅा. डी. लक्ष्मण, डॅा. हंसराव वैद्य, लायन्स क्लबचे अध्यक्ष जयेश ठक्कर, रोटरीचे अध्यक्ष डॅा. दिपक मोरताळे, डॅा. करुणा पाटील, डॅा. वाय. एस. चव्हाण, गुणवंत पाटील-हंगरगेकर आदींची उपस्थिती होती.
 मरावे परी..देहरुपी उरावे.. या उक्तीच्या घोषणेसह... भव्य जनजागरण फेरी काढण्यात आली. तरूण, विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्तसहभागासह विविध स्वयंसेवी संस्थांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या फेरीला भव्य असे रुप प्राप्त झाले होते.
           
अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करताना कुलगुरु डॅा. विद्यासागर पुढे म्हणाले की, वैचारिक स्थित्यंतराच्या  काळात, आता मृत्युची संकल्पनाही बदलते आहे. विज्ञान-तंत्रज्ज्ञानामुळे मृतमेंदु संकल्पना पुढे आली. या नव्या संकल्पना आता स्विकाराव्या लागतील. मृत व्यक्तीलाही अवयवदानाच्या स्वरुपात अनेक व्यक्तींमध्ये  देहरुपी  उरता येते. यापुर्वी आपण ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे असे म्हणत असू, पण आता मरावे परी देहरुपी उरावे ही उक्तीही सत्यात आली आहे. हे वाक्य घेऊन, तरुणांनी समाजात जावे लागेल. इतरांमध्ये परिवर्तन घडवून आणताना , स्वतःपासून त्याची सुरवात करावी लागेल. अवयवदानाचे परिवर्तन समाजात रुजविण्यासाठी तरुणांना संदेशदूत व्हावे लागेल.
जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, अवयवदानाची  ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून आणि आपल्या कुटुंबापासून सुरवात करावी लागेल. पुर्वी रक्तदानाकरिता आणि कालांतराने  नेत्रदानाकरिता  अशी  चळवळ उभी करावी लागली होती. त्याचप्रमाणे अवयदानाकरिता समाजात जागृती निर्माण करण्यासाठी कुटुंबापासून सुरवात करावी लागेल. आगामी सण-उत्सवाच्या काळातही अवयदानाबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
समारंभाची सुरवात धन्वंतरी पुजनाने झाली. सक्षम संस्थेच्या सदस्यांनी स्वागतगीत सादर केले. जिल्हा  शल्यचिकित्सक  डॅा.  कंदेवाड यांनी प्रास्ताविक केले. रेडक्रॅास, लायन्स क्लब, शुभकरोंती फाऊंडेशन, रोटरी क्लब यांनी या अभियानासाठी उत्स्फुर्त सहकार्य केल्याचे डॅा. कंदेवाड यांनी नमूद केले. डॅा. गौरी जाधव यांनी अवयदानाच्या संकल्पनेबाबत सादरीकरण केले. सक्षमचे बी. डी. शिंदे, अधिष्ठाता डॅा. श्यामकुंवर, डॅा. येळीकर यांचीही समयोचित भाषणे झाली. डॅा. दिपक हजारी यांनी आभार मानले. डॅा. उज्ज्वला पवार यांनी पसायदान सादर केले. आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अवयदानाबाबतचे पथनाट्यही सादर केले.
तत्पुर्वी, आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणातून भव्य जनजागरण फेरीस सुरवात झाली. कुलगुरु डॅा. विद्यासागर, जिल्हाधिकारी श्री. काकाणी आदी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून फेरीस मार्गस्थ करण्यात आले. आयुर्वेद महाविद्यालय, शिवाजीनगर, महात्मा ज्योतीबा फुले पुतळा परिसर-आयटीआय चौक ते कुसुम सभागृह पुढे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह श्री  गुरुगोबिंदसिंघजी स्टेडीयम परिसर अशा मार्गावरून फेरी काढण्यात आली. फेरीत विविध राष्ट्रीय सेवा योजनांतर्गत विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, वैद्यकीय महाविद्यालय, नर्सीग महाविद्यालय तसेच विविध स्वंयसेवी संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आदींनी सहभाग घेतला. अवयदानाचे महत्त्व स्पष्ट करणारी घोषवाक्यांचे फलक, त्याबाबत घोषणा यामुळे फेरी लक्षवेधी ठरली. अतिरिक्त जिल्हाशल्य  चिकित्सक डॅा. एच. आर. गुंटूरकर, डॅा. व्हि. एन. भोसले, डॅा. दिपक शिरसीकर आदींनी फेरीचे व समारंभाचे संयोजन केले.

00000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...