Monday, August 3, 2020


तहसिल कार्यालयात ऑक्सिजन पार्क

नांदेड, (जिमाका) दि. 3 :- नांदेड तहसिल कार्यालयाच्या परिसरात असलेल्या जवळपास 80 आर मोकळ्या जागेवर आता विविध वृक्षांची लागवड करुन त्याचे अनौपचारिक उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते करण्यात आले. तहसिल कार्यालयाच्या परिसरात असलेल्या या मोकळ्या जागेवर पाणी साचून घाण निर्माण झाली होती. या वृक्षलागवडीमुळे आता या जागेसह घाणीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

तहसीलदार डॉ. अरुण जऱ्हाड यांनी यासाठी पुढाकार घेऊन काही महिन्यांपूर्वी जेसीबीच्या सहाय्याने ही जागा साफ करुन मोकळे मैदान तयार केले होते. जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी वृक्षारोपण करुन हरित परिसर करावा अशा सूचना प्रभारी तहसीलदार सारंग चव्हाण व कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाची पूर्ण तयारी व आखणी केली. वृक्ष मित्र फौंडेशनचे संतोष मुगटकर यांची टीम तसेच सामाजिक वनीकरण विभाग यांनी सर्वतोपरी यासाठी मदत केली.

नेरली, मरळक तसेच अर्धापुर तालुक्यातील विविध नर्सरी मधून सामाजिक वनीकरण विभागाने 4 हजार वृक्ष उपलब्ध करुन दिले. कर्मचाऱ्यांच्या लोकसहभागातून परिसरास तारेचे कुंपण व पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या जागेत वड, पिंपळ, जांभूळ, करंज, गुलमोहोर , आंबा , पेरु अशा विविध प्रजातीचे 4 हजार वृक्ष जापनीज पर्यावरण तज्ज्ञ डॉ. मियावाकी यांचे पद्धतीनुसार 1 चौमी जागेत 3 वृक्ष त्रिकोणाकृती जागेत घनदाट पद्धतीने लावण्यात आले आहेत. भविष्यात या झाडांचे संवर्धन करण्याचा संकल्प महसूल दिनी सर्व कर्मचाऱ्यांनी केला.

महसूल दिनाच्या औचित्य साधून या जागेस ऑक्सिजन पार्क म्हणून नामकरण करण्यात आले. यावेळी छोटेखानी समारंभास मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार मुगाजी  काकडे यांनी केले तर आभार  नायब तहसीलदार श्रीमती उर्मिला कुलकर्णी यांनी मानले. नायब तहसीलदार विजयकुमार पाटे तसेच सर्व अव्वल कारकून, लिपिक, मंडळ अधिकारी, तलाठी , शिपाई व कोतवाल यांनी वृक्षारोपण व महसूल दिन कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले.
0000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...