Thursday, May 20, 2021

 

मान्सूम पूर्व कामे संबंधित यंत्रणांनी वेळेच्या आत पूर्ण करावी

 

- जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- मान्सूम काळात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या विभाग प्रमुखांनी योग्य ती खबरदारी घेऊन मान्सूम पूर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी आणि इतर लहान-मोठ्या नद्या लक्षात घेता जवळपास 337 गावांना पुरांचा धोका हा उद्भवू शकतो. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या-त्या भागातून सुरक्षिततेच्या उपाययोजना योग्य पद्धतीने जिल्हा प्रशासनाला हाताळता याव्यात यादृष्टिने सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. मान्सून 2021 च्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांच्यासह परिवहन,  सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे,  महानगरपालिका, आरोग्य,  कृषि,  महसूल विभाग आदी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष तर तालुकास्तरावरील उपविभागीय अधिकारी,  तहसीलदार, मृद व जलसंधारण, विद्युत, पोलीस, अग्निशमन, शिक्षण, पशुसंवर्धन  विभागाचे अधिकारी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. 

पावसाळयात उद्भवणाऱ्या विविध खरेदी आपत्तींना तोंड देण्यासाठी आणि सावधगिरीच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर पुढे म्हणाले, जिल्ह्यात 337 गावे पूरग्रस्त आहेत या गावात रंगीत तालीम घ्याव्यात. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणाची आवश्यक साहित्यांची करावी. 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन कक्षातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक अद्यावत करावेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहतील यांचे नियोजन करावे. आदिवासी व ग्रामीण भागात सर्पदंशासह इतर आजारांवरील उपचार स्थानिक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातच करावेत. रुग्णाला औषध उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासू नये. आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करावी. पावसाळयात उत्पन्न होणाऱ्या साथीच्या रोगराईंना थांबविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलकपणे औषधी, रक्तसाठा इतर अनुषंगिक साहित्य उपलब्ध करावीत. ब्लिचिंग पावडरची साठवणुक सुरक्षितपणे ठेवून त्याचा योग्य उपयोग करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर आरोग्य विभागाला दिले. 

गावांना धोका होऊ नये  यादृष्टीने पाझर तलावाची दुरुस्ती करुन गाळ काढावा. शहरातील धोकादायक इमारतीना नोटीस देवून नियमानुसार कारवाई करावी. पुर परिस्थितीत नदी काठच्या लोकांचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. सुरक्षित स्थळे निश्चित करावीत. तसेच महावितरण, जिल्हा पुरवठा कार्यालय, शिक्षण विभाग, पशुसंवर्धण विभाग, कृषि विभाग यांनाही आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. 

सर्व प्रमुख यंत्रणांनी  या मान्सून कालावधीत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावीत. पाटबंधारे विभागाने गोदावरी व इतर नदीच्या पाणी पातळीचा धोका, इशारा पातळीबाबत उपाययोजना करतांना सर्व विभागांशी समन्वय ठेवून धरणनिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.  उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तालुकास्‍तरावर मान्सुन पूर्व तयारीची आढावा बैठक घेवून पूर परिस्थिती प्रतिबंधक कामे मान्सून पूर्वी करावीत. आपत्कालिन नियंत्रण कक्षातील शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल संपर्क अद्यावत करावीत. वाहन व्यवस्था सुस्थितीत ठेवावी. विजपातामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जनजागृती आणि बचाव कार्याचे रंगीत प्रशिक्षण पूर्ण करावेत. नगरपालिका प्रशासनाने शहरातील नाली साफसफाईचे कामकाज युध्‍द पातळीवर करावेत. आपत्ती निवारणाची कामे सक्षमपणे पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी यावेळी दिले. 

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. 

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...