Wednesday, November 2, 2022

माहितीच्या गर्दीत सकारात्मकतेचा

आवाज अधिक बुलंद होण्याची आवश्यकता

-  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर  

 

·  13 नोव्हेंबर रोजी नांदेड येथे भव्य

पॅन इंडिया कायदेविषयक जागरूकता शिबीर   

नांदेड (जिमाका) दि. 2 :- सर्वांपर्यंत न्याय पोहचण्याच्या उद्देशाने, लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेमधून शासन सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी व्यापक योजना आखते. भारतीय राज्यघटनेने यासाठी विशेष तरतुदी केलेल्या आहेत. त्यानुसार आखलेल्या योजनाद्वारे अनेकांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदतही होते. विविध शासकीय यंत्रणा या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. तथापि यातील तांत्रिक अपवाद व वस्तुस्थिती समजून न घेता योजनेच्या हिताविरुद्ध होणारी चर्चा समाजासाठी घातक असून माहितीच्या गर्दीत सकारात्मकतेचा आवाज अधिक बुलंद होण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी केले. 

नांदेड येथे जिल्हा पातळीवरील पॅन इंडिया कायदेविषयक जागरुकतेच्यादृष्टिने मोठ्या प्रमाणात 13 नोव्हेंबर रोजी शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबिराच्या आढावा बैठकीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर बोलत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी. एम. जज, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस उपअधिक्षक डॉ. अश्विनी जगताप, समाज कल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. 

जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत कायदेविषयक जागरूकता निर्माण करून त्यांना विविध योजना दिल्यास त्या योजनांचे लाभार्थी म्हणून ते व्यापक हित पाहतील. यातून योजनांचा उद्देश सफल होण्यास मदत होईल. नागरीकरणाच्या या प्रक्रियेत म्हणूनच कायदेविषयक साक्षरता अत्यावश्यक आहे. सर्वसामान्य लोकांना त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजना व्यवस्थित पोहोचविल्या तर खऱ्या अर्थाने त्यांना न्यायाच्या कक्षेत सामावून घेतल्या सारखे आहे. या योजना शिबिराच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचाव्यात हा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी सांगितले. 

नांदेड जिल्ह्यात सामुहिक प्रयत्नातून गतवर्षी हा विशेष उपक्रम किनवट सारख्या आदिवासी तालुक्यातील मांडवी येथे यशस्वीपणे राबविला आहे. सर्व विभागाच्या समन्वयातून यावर्षीचा हा उपक्रम अधिक यशस्वीपणे राबविण्याची तयारी करू असे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. या बैठकीत जिल्ह्यातील शासनाच्या विविध प्रमुखांनी आपल्या योजनांची माहिती सादर केली. प्रारंभी जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव तथा न्यायाधीश डी. एम. जज यांनी पॅन इंडिया कायदेविषयक जागरुकता उपक्रमाबाबत माहिती दिली.  

0000




No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक 24 दर्पण दिनानिमित्त आज जिल्हाधिकाऱ्यांचे व्याख्यान  नियोजन भवनमध्ये ४ वाजता पत्रकार दिन कार्यक्रम  नांदेड दि. 5 जानेवारी : ...