Tuesday, December 12, 2023

 वृत्त क्र. 853

नांदेडकरांनो जन आरोग्य योजनेच्या

ऑनलाईन कार्डासाठी तात्काळ नोंदणी करा

-         मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल   

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात एकत्रीत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यासाठी सुमारे 23 लाख पात्र लाभार्थी आहेत. आरोग्य विभागाकडून सर्वांची नोंदणी या योजनेच्या लाभार्थ्यांनी करावी यासाठी गावपातळीवर नियोजन केले आहे. विविध माध्यमातून जनतेला आवाहनही वेळोवेळी करण्यात येत आहे. तथापि सद्यस्थितीत या 22 लाख 89 हजार 441 लाभार्थ्यांपैकी केवळ 27 टक्के लाभार्थ्यांनीच आयुष्यमान कार्डासाठी नोंदणी केल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास आलेले आहे. आरोग्यासाठी बाहेर होणारा खर्च टाळण्यासाठी व विशेषत: न टाळता येणाऱ्या आजारांवर तात्काळ नि:शुल्क उपचारासाठी आयुष्यमान कार्ड अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वाधिक प्राधान्य या बाबीसाठी देऊन ऑनलाईन पद्धतीने तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.  

 

या योजनेंतर्गत सुमारे 1 हजार 300 पेक्षा अधिक विविध प्रकारच्या व्याधी आजारांवर उपचार व वेळप्रसंगी शस्त्रक्रिया या मोफत पुरविल्या जातात. शासकीय रुग्णालयांसह शासनाने यासाठी काही खाजगी रुग्णालयांनाही अंगिकृत केले असून त्याठिकाणीही या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला कोणत्याही आजारावर तात्काळ विनाशुल्क उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी केंद्र व राज्य सरकारने एकत्रीत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही उपलब्ध करून दिली आहे.

 

ग्रामीण भागात अनेक कुटुंबांना उपचाराचा खर्च न परवडल्यामुळे ते कर्जाच्या विळख्यात सापडतात. बऱ्याचवेळा उपचारासाठी टाळाटाळ केल्याने दुरूस्त होणारे आजार बळावून दुर्धर आजारात त्याचे रूपांतर होते. हे टाळण्यासाठी सर्व केशरी, पिवळे, पांढरे रेशनकार्डधारक कुटूंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. याचबरोबर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका, अंत्योदय योजनेचे लाभधारक यांनाही ही योजना लागू आहे. ऑनलाईन अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीतील केंद्रचालक, सीएससी सेंटर, आशाताई, अंगिकृत रुग्णालयातील आरोग्य मित्र तसेच सर्व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, प्राथामिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र आदी सर्व शासकीय रुग्णालयात याबाबत मार्गदर्शन उपलब्ध आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ही मोबाईमध्ये आयुष्यमान ॲप डाऊनलोड करून त्यात आपल्या नावाची नोंदणी करता येईल.

00000   



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...