Monday, December 11, 2023

 वृत्त क्र. 851 

ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स बद्दल

असलेल्या शंका समाधानासाठी जनजागृती मोहिम

 

नांदेड (जिमाका) दि. 11 :- नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघाअंतर्गत एकुण 3 हजार 41 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्राच्या 10 टक्के इतक्या मर्यादेत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्स प्रशिक्षण, प्रचार, प्रसार, प्रसिद्धी व जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशान्वये नांदेड जिल्हास्तरीय वेअरहाऊस येथे ठेवण्यात आलेल्या एफएलसी ओके मशीन्स जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघांना जनजागृतीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

 

निवडणूक विभागातर्फे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी इव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहिम राबविण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी यांनी सदर जनजागृती मोहिमेचे वेळापत्रक / आराखडा तयार केला असून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक स्थिर पथक व मतदारसंघात फिरते पथक गठीत करण्यात आले.

 

इव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळणीचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर बीईएल कंपनीचे इंजिनीअर यांच्यामार्फत 8 डिसेंबर 2023 रोजी देण्यात आले आहे. विधानसभा मतदारसंघातील पथकात एक प्रशिक्षित मास्टर ट्रेनर, जबाबदार अधिकारी व कर्मचारी तसेच फिरते पथकात एक अधिकारी, एक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पथकासाठी सर्व गावे, वाड्या यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी सुरक्षा ठेवण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बदल असणाऱ्या सर्व शंका व हाताळतांना येणाऱ्या अडचणी दूर होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला.

0000

No comments:

Post a Comment