Thursday, October 3, 2024

 वृत्त क्र. 896 

युवक-युवतींसाठी मुदखेड, उमरी येथे सोमवारी उद्योग मेळावा   

नांदेड, दि. 3 ऑक्टोबर :  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत नांदेड जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी उद्योग मेळाव्याचे आयोजन सोमवार 7 ऑक्टोबर रोजी मुदखेड पंचायत समिती सभागृह

 व उमरी पंचायत समिती सभागृह या तालुक्यामध्ये सकाळी 10 वा. करण्यात आले आहे. तालुक्यातील व आजूबाजूच्या परिसरातील पात्र, होतकरू सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी सदर मेळाव्यास उपस्थित राहून, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी यांनी केले आहे.   

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2024-25 साठी नांदेड जिल्हयास एकूण एक हजार युवक-युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे. या योजनेतून मोठया प्रमाणात स्वतःचा उद्योग उभारणी करुन त्याअंतर्गत स्वयंरोजगार निर्मिती होणार असल्याने मुदतीत लक्षांक पूर्ती होण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. 

त्याचाच एक भाग म्हणून या योजनेतंर्गत 7 ऑक्टोबर 2024 रोजी मुदखेड व उमरी या दोन तालुक्यांमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात कर्जमंजूरी प्रस्तावाबाबत अर्ज अपलोड करणे, मंजूरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या पुढील कागदपत्रासह या मेळाव्यास उपस्थित राहावे. तसेच या योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनी आवश्यक त्या कागदपत्रासह, कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित राहावे. 

आधार कार्ड. पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने आवश्यक आहेत. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in संकेतस्थळ आहे, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ प्रारूप मतदार यादीत आजच आपले नाव तपासा मतदार मदत क्रमांक १८०० २२ १९५० वर संपर्क करा #मतदारय...