Thursday, September 9, 2021

 जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील लोकांशी भेट घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला धीर

 नांदेड (जिमाका) दि. 9 :- सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांची घरे पाण्याखाली आली. काही ठिकाणी छोटे रस्ते व पूल वाहून गेले. या सर्व परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी व जनतेला भेटून धीर देण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्ह्याचा धावता दौरा केला. यावेळी त्यांच्यासमेवत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, महापौर मोहिनी येवनकर, माजी आमदार वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती संजय बेळगे आदी मान्यवर उपस्थित होते. 

नांदेड शहरातील खडकपुरा, दुलेशहा रहेमान, राष्ट्रीय गांधी विद्यालय गाडीपुरा, नावघाट, पाकिजा फंक्शन हॉल देगलूरनाका येथे त्यांनी भेट देऊन नागरीकांशी सुसंवाद साधला. याचबरोबर महानगरपालिका व सेवाभावी संस्थांच्यावतीने केल्या जात असलेल्या मदतीची त्यांनी माहिती घेतली. दुपारच्या सत्रात त्यांनी कंधार तालुक्यातील देवीची वाडी येथील क्षतीग्रस्त पूल व वाहून गेलेल्या शेतीची पाहणी केली. यानंतर मुखेड तालुक्यातील कमळेवाडी, मुखेड येथील क्षतिग्रस्त पूल, नायगाव, लोहगाव येथील लघुसिंचन तलावाचे झालेले नुकसानीचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. 

दिवसेंदिवस नैसर्गिक आव्हानांची संख्या वाढीस लागली आहे. काही ठिकाणी अचानक होणारी अतिवृष्टी, यामुळे येणारे महापूर, काही ठिकाणी पावसाची हुलकावनी हे सारे पर्यावरण असंतुलनाचे व हवामान बदलाचे संकेत आहेत. केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण जगभर अशा नैसर्गिक आपत्तीला लोकांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्याच्या मंत्रीमंडळ पातळीवर चर्चा सुरु असून लवकरच याबाबत कृति आराखडा केला जा असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. 

जिल्ह्यात विविध रस्ते व पुलांचे झालेले नुकसान हे मोठ्या प्रमाणात आहे. याचाही स्वतंत्रपणे आढावा घेऊन ज्या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत अशा लहान व पाण्याखाली येणाऱ्या पुलांबाबत लवकर निर्णय घेऊन आम्ही याबाबत कायम स्वरुपी मार्ग कसा काढता येईल याचे नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

देगलूर येथे त्यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सादरीकरणाद्वारे केलेल्या अतिवृष्टी नुकसानीचा आढावा जिल्हा प्रशासनाकडून घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माहिती दिली. उपविभागीय दंडाधिकारी शंक्ती  कदम यांनी तालुक्यातील बिकट परिस्थिती व शासनाच्यावतीने युद्धा पातळीवर केलेल्या मदत कार्याचा आढावा मांडला.

00000  








No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...