Thursday, September 9, 2021

विमा दावा मंजूर होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित विमा कंपनीस कळवावे

 - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यात 1 सप्टेंबरपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठया प्रमाणात पुर येऊन शेती व पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे.  विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळण्यासाठी झालेल्या नुकसानीची पुर्व सुचना संबधीत शेतकऱ्यांनी तात्काळ विमा कंपनीस कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. कंपनीच्या नियमाप्रमाणे ही माहिती 72 तास म्हणजेच तीन दिवसाच्या आत कळविणे क्रमप्राप्त आहे. 

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गीक आग या नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडुन वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. 

विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती, पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक विमाधारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन क्रॉप इंन्सुरन्स हे ॲप डाउनलोड करुन घ्यावे. त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा supportagri@iffcotokio.co.in या पत्यावर ई- मेलवर नुकसानीची पुर्वसुचना द्यावी. काही तांत्रीक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमांद्वारे विमा कंपनीस पुर्वसुचना देऊ न शकल्यास तालुका प्रतिनिधी, इफ्को टोकीयो विमा कंपनी किंवा संबधीत तालुका कृषि अधिकारी कार्यालयास  किंवा आपल्या  गावातील संबधित कृषि  सहाय्यकाकडे ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाने कळविले आहे.

0000


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...