Saturday, May 15, 2021

 

किनवट येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत

आता अकरावी व बारावी वर्गासाठी श्रेणीवाढ

दुर्गम भागातील आदिवासी मुलांना पुढील शिक्षणाची नवी संधी

– पालकमंत्री अशोक चव्हाण 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- तेलंगणा राज्याच्या काठावर असलेल्या किनवट सारख्या तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी युवकांना आता महाराष्ट्र शासनाने पुढील शिक्षणासाठी नवी संधी उपलब्ध करुन दिली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत किनवट येथे चालविण्यात येणाऱ्या शासकिय माध्यमिक आश्रमशाळेची श्रेणीवाढ करुन संलग्न कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा या आश्रमशाळेला देण्यात आलेला आहे. या भागातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी मुलांना अकरावी व बारावीच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी व त्यांनाही विकासाच्या प्रवाहात घेता यावे असा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाचा पाठपुरावा करुन किनवट येथे ही मान्यता मिळवून घेतली. 

आदिवासी विभागाने यासंदर्भात शासन निर्णय काढून किनवट येथे कला व विज्ञान या दोन्ही शाखांना अटीनुसार मान्यता दिली. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून या आश्रमशाळेमध्ये अकरावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत व सन 2022-23 पासून बारावीचे वर्ग सुरु करण्यात यावेत असे शासन निर्णयात निर्देशीत केले आहे. कला व विज्ञान या दोन्ही शाखेचे हे वर्ग असतील असेही स्पष्ट केले आहे. वित्त विभागाच्या शासन निर्णयात शिथिलता आल्यानंतर आकृतीबंधानुसार नवीन पद मान्यतेचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागामार्फत शासनास सादर केला जाईल. याचबरोबर ही श्रेणीवाढ मान्यता देतांना आश्रमशाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. यात प्रामुख्याने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल हा किमान 80 टक्के असावा तसेच किमान 60 टक्के विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळणे आवश्यक राहिल. याचबरोबर बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या सोई-सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करणे व शिक्षणाचा स्तर उत्कृष्ट ठेवणे बंधनकारक राहिल.

आदिवासी युवकांना पुढील शिक्षणाची नवी संधी मिळाल्याचा आनंद

नांदेड जिल्ह्याची व्याप्ती ही इतर जिल्ह्याच्या तुलनेत मोठी आहे. या जिल्ह्यात विविध धर्माची लोकसंख्या आहे. काही तालुके हे आदिवासी बहुल तालुके आहेत. किनवट सारख्या तालुक्यातील युवकांना विकासाच्या संधी मिळण्यासाठी चांगल्या शिक्षणाच्या संधी आगोदर मिळणे आवश्यक होते. त्यादृष्टिने किनवट येथील आश्रमशाळेच्या श्रेणीवाढचा प्रस्ताव बऱ्याच दिवसांपासून विचारात होता. आदिवासी विभागाशी पाठपुरावा करुन आता याठिकाणी विद्यार्थ्यांना कला व विज्ञान या दोन्ही शाखेत बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध झाले याचा मनस्वी आनंद होत असल्याची प्रतिक्रिया नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

----****----

(सोबत संग्रहित छायाचित्रे)





No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...