Saturday, May 15, 2021

 

आजार असेल तर आता घरी बसल्या ॲपद्वारे

घेता येईल डॉक्टरांचे मार्गदर्शन 

नांदेड (जिमाका) दि. 15 :- कोरोना सारख्या आव्हानात्मक काळात अत्यावश्यकतेप्रमाणे वारंवार करावे लागणारे लॉकडाऊन आणि इतर निर्बंध लक्षात घेता आजारी व्यक्तींना वेळीच डॉक्टरांचा सल्ला मिळावा या उद्देशाने आता आरोग्य विभागातर्फे घरी बसल्या ॲपद्वारे मार्गदर्शन घेता येईल. गतवर्षी सुरुवातीच्या काळात जी स्थिती होती ती लक्षात घेऊन शासनाने ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडी सुरु केली. ही सेवा आता नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. कोरोनामुळे आजारी असलेले जे गृहविलगीकरणात आहेत ते सुद्धा या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत आहेत. 

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची नोंदणी या ॲपच्या ॲप्लीकेशनमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येकाला ठराविक दिवस आणि वेळ ठरवून दिलेले असल्यामुळे सर्व संबंधित तज्ज्ञ डॉक्टर या ॲपवर उपलब्ध राहून नागरिकांना सुविधा देणे सुलभ झाले आहे. 

ई-संजीवनी ओपीडी ही ऑनलाईन सेवा (https://esanjeevaniopd.in/) या वेबपोर्टलवर किवा अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईल असेल तर Google Play Store वर esanjeevaniopd या अ‍ॅपवर लाभ घेता येईल. ही सुविधा रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही उपलब्ध आहे. रुग्णांना एसएमएसद्वारे ई-प्रिस्कीप्शन अर्थात त्यांच्या आजारानुसार औषधांची यादी पाठविण्यात येईल.  या सुविधेचा नांदेड जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले.

ई-संजीवनी ओ.पी.डी. नोंदणी करण्याची पद्धत

-संजीवनी ओ.पी.डी. सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्ण https://esanjeevaniopd.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधू शकतात किंवा अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलमध्ये Google Play Store मध्ये जाऊन esanjeevani OPD National Teleconsultation Service या नावाचे अ‍ॅप (App) डाऊनलोड करता येईल. 

नोंदणी व टोकन जनरेशन : आपला मोबाईल नंबर टाकून, वनटाइम ओटीपी (वनटाइम पासवर्डद्वारे) द्वारे सत्यापित (Verify) करा. मोबाईल नंबर सत्यापित झाल्यानंतर रुग्णाची सविस्तर माहिती भरा व टोकन जनरेट करा. 

लॉगइन (Patient Login) : आपल्ला मोबाईल नबर व टोकन  नंबर टाकून लॉगीन करा.लॉग इन झाल्यावर तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व तुमचा नंबर आल्यानंतर कॉल नाऊ (Call Now) वर क्लिक करुन डॉक्टरांसोबत सल्लामसलत करा.

---0000---




No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...