Thursday, September 29, 2016

लेख

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना
कृषि उत्पादन वाढीसाठी अनुदानाच्या विविध योजना  


अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे कृषि उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणण्यास सहाय्य करण्याचे दृष्टीने शासनाच्या कृषि विभागामार्फत अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना ) सन 1982 पासून राज्यात राबविण्यात येते. सन 2016-17 या आर्थीक वर्षात ही योजना राज्यात राबविण्यासाठी शासनाने दिनांक 30 जुलै 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार 196 कोटी 34 लाख 31 हजार रुपयाची या कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असून निधी जिल्हास्तरावर उपलब्ध करुन दिलेला आहे. या योजनेविषयी थोडक्यात माहिती…
             
या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना जमीन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पीक संरक्षण, शेतीची सुधारीत अवजारे, बैलगाडी, बैलजोडी, रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरुस्ती, पाईप लाईन, पंप संच, नवीन विहीर, शेततळे, परसबाग लागवड, तुषार / ठिबक सिंचन संच व ताडपत्री या बाबींचा विहित अनुदान मर्यादेत लाभ देण्यात येतो.
            अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या कृषि उत्पादनात वाढ करुन त्यांची आर्थिक उन्नती करणे हे योजनेचे उद्दीष्ट आहे. योजनेची व्याप्ती राज्यातील सर्व 34 जिल्ह्यात आहे.  
            पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध वर्गातील असणे बंधनकारक आहे. जमिनीच्या सात/बारा व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे. दारिद्र्य रेषेवरील शेतकऱ्यांसाठी उत्पन्न मर्यादा रुपये 50 हजाराच्या मर्यादेत व उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थींची जमीनधारणा 6 हेक्टर पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य असणार आहे.  
योजना राबविणारी यंत्रणा जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद व तालुकास्तरावर गट विकास अधिकारी कृषि अधिकारी पंचायत समिती आहे.
योजनेच्या लाभाचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या कृषि विकासाकरीता 14 बाबींवर योजनांतर्गत अनुदान अनुज्ञेय आहे. यामध्ये जमीन सुधारणा एक हेक्टर मर्यादेत 40 हजार रुपयाच्या मर्यादेत. निविष्ठा वाटप एक हेक्टर मर्यादेत 5 हजार रुपयेच्या मर्यादेत. पीक संरक्षण, शेती सुधारीत अवजारे 10 हजार रुपयेच्या मर्यादेत. बैलजोडी / रेडेजोडी 30 हजार रुपयेच्या मर्यादेत. बैलगाडी 15 हजार रुपयेच्या मर्यादेत. जुनी विहिर दुरुस्ती 30 हजार रुपयेच्या मर्यादेत. इनवेल बोअरिंग 20 हजार रुपयेच्या मर्यादेत. पाईप लाईन तीनशे मीटरपर्यंत 20 हजार रुपयेच्या मर्यादेत, पंपसंच 20 हजार रुपयाच्या मर्यादेत. नवीन विहिर (रोहयो योजनेनुसार) 70 हजार ते 1 लाख रुपयेच्या मर्यादेत. शेततळे 35 हजार रुपयेच्या मर्यादेत. परसबाग कार्यक्रम 200 रुपये प्रती लाभार्थी. तुषार, ठिबक सिंचन संच पुरवठा 25 हजार रुपये प्रती हेक्टरच्या मर्यादेत. ताडपत्री 10 हजार रुपये प्रती लाभार्थीच्या मर्यादेत राहील यांचा समावेश आहे.
            या घटकांपैकी लाभार्थींच्या मागणीनुसार आवश्यक त्या घटकांचा लाभ देण्यात येतो. नवीन विहिर घटकांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीना उच्चतम लाभ मर्यादा 70 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत अनुज्ञेय आहे. या लाभार्थीना इतर घटकांचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. नवीन विहीर घटकाव्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींना 50 हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान अनुज्ञेय आहे. योजनेचा लाभ लाभार्थ्यास दोन आर्थिक वर्षात देण्यात येतो. इच्छुक अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घेवून आर्थिक उन्नती साधावी.

-         काशिनाथ आरेवार
जिल्हा माहिती कार्यालय नांदेड
000000


No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...