Friday, September 30, 2016

धर्मादाय रुग्णालय आरोग्य योजनेचा
जास्तीत जास्त रुग्णांना लाभ द्या - अलोने
नांदेड दि. 30 :- धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत व सवलतीच्या दराने खाटा राखून ठेवण्याच्या योजनेगरीब आणि निर्धन अशा रुग्णांना उपचार घेता यावेत यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत, असे निर्देश सहायक धर्मादाय आयुक्त मंजुषा अलोने यांनी दिले. धर्मादाय रुग्णालय योजनेबाबत रुग्णालयांच्या प्रतिनिधींच्या  उपस्थितीत गुरूवार 29 सप्टेंबर रोजी बैठक संपन्न झाली. त्यावेळी श्रीमती अलोने यांनी हे निर्देश दिले.
धर्मादाय रुग्णालय म्हणून नांदेड शहरात रयत रुग्णालय, सोमेश कॅालनी.  डॉ. वाडेकर यांचे हॅास्पीटल, शिवाजी पुतळ्याजवळ तसेच डॅा. भालेराव यांचे जिजामाता हॅास्पीटल गुरद्वारा रोड ही तीन रुग्णालये कार्यरत आहेत. या रुग्णालयांकडे उपलब्ध खाटांपैकी गरीबासाठी आणि निर्धनांसाठी प्रत्येकी दहा टक्के खाटा आरक्षित आहेत.
संबंधित रुग्णालयात दाखल होणाऱ्या निर्धन आणि गरीब रुग्णांबाबतचा अहवाल नियमित देण्यात यावा, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले. रुग्णालयांनी या योजनेबाबत रुग्णालयाच्या दर्शनी भागात तसेच रेल्वे स्टेशन, बसस्थानक यांच्यासह विविध शासकीय कार्यालये आदी ठिकाणी या योजनेची माहिती देणारे फलक प्रदर्शित करावेत, माहिती देण्यासाठी रुग्णमित्र नियुक्त करण्यात यावेत. या रुग्णांना सर्व सेवा उपलब्ध करून द्याव्यात, निर्धन रुग्णांना पुर्णपणे मोफत तर गरीब रुग्णांना उपचारात 50 टक्क्यापर्यंत सवलत द्यावी. गरीब व निर्धन असलेल्यांना पुराव्यांची सक्ती न करता जिल्हाधिकारी  किंवा अधीनस्त अधिकाऱ्यांकडून प्राप्त पत्रांच्या आधारे दाखल करून घ्यावे, अशाही सूचना देण्यात आल्या. गरीब व निर्धन रुग्ण त्यांचेकडे  पुरेसे पुरावे  नसल्यास  पिवळे  रेशन  कार्ड  दाखवून  धर्मादाय रुग्णालयात उपचार घेऊ शकतात.
धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि गरीब रुग्णांना द्यावयाच्या आरोग्य सुविधांबाबत अधिक माहिती किंवा नोंदणीसाठी संबंधित रुग्णालय, जिल्हा शल्यचिकित्सक, धर्मादाय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...