Saturday, June 10, 2023

 छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर

यांचा सामाजिक समतेचा वारसा जपण्याची आवश्यकता

- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

 

नांदेड (जिमाका) दि. 10 :- महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर आदी मान्यवरांचा सामाजिक समतेचा वारसा लाभलेला आहे. हा समृद्ध वारसा अधिक जबाबदारीने जपण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. बोंढार हवेली येथे अक्षय भालेराव याची हत्या ही अत्यंत दुर्देवी असून सामाजिक समतेच्या विचाराचा हा पराभव असल्याची खंत केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तिकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. बोंढार हवेली येथे आज त्यांनी पिडित कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. याचबरोबर केंद्र शासनाच्यावतीने पिडित कुटूंबियांना शासनाच्या तरतुदीप्रमाणे 8 लाख 25 हजार रुपयांची आर्थिक मदत त्यांनी जाहीर केली. यातील 4 लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश त्यांनी पिडित कुटुंबियांकडे हस्तांतरीत केला.

 

या भेटीनंतर त्यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाला निर्देशही दिले. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, समाज कल्याण अधिकारी बापु दासरी, सत्येंद्र आऊलवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

पिडित कुटुंबाला पुन्हा आत्मविश्वास देऊन उभे करणे हे सर्व समाजाचे कर्तव्य आहे. याचबरोबर जिल्हा प्रशासनानेही शासन स्तरावर उपलब्ध असलेल्या तरतुदीप्रमाणे सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. आजही या गावात जे कुटुंब भयाच्या सावटाखाली राहत आहे त्यांची इतर ठिकाणी व्यवस्था होते का हे तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. या गावात पिडित व भयाच्या सावटाखाली जर कोणी कुटुंब असतील तर त्यांचे पूनर्वसनही होणे गरजेचे आहे. यादृष्टीने सिडको, मनपाची घरे अथवा बाहेरगावी त्यांच्या निवाऱ्यासाठी नियमाप्रमाणे उपलब्धतेप्रमाणे 33 बाय 33 आकाराचा प्लॉट / जागा देण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. प्लॉट / मनपाची घरे, सिडकोची घरे यापैकी ज्या ठिकाणी नियमाप्रमाणे जे शक्य असेल त्याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

 

समाजातील सर्वच घटकांचा विकास व्हावा ही भूमिका सामाजिक न्याय विभागाचा राज्यमंत्री म्हणून कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या गटातील मराठा समाजालाही आरक्षण मिळावे ही भूमिका आम्ही घेतली आहे. सर्वांनाच समान विकासाची संधी मिळावी, ही त्यामागची भूमिका आहे. महाराष्ट्रात सामाजिक न्यायासाठी सर्व समाजात परस्पर न्यायाची असलेली भूमिका ही अत्यंत महत्वाची असून सामाजिक सलोखा व एकात्मता वाढवण्यासाठी सर्वांनीच अधिक जबाबदार भूमिका घेतली पाहिजे, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

00000







No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   92 फिरत्या वाहनावरील दुकानासाठी दिव्यांगांना अर्ज करण्याची संधी  नांदेड, दि. 23 जानेवारी :- हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्...