Tuesday, January 25, 2022

 जिल्‍हयात राष्‍ट्रीय मतदार दिन उत्‍साहात साजरा

लोकशाही संकल्‍प पत्र, आकाश कंदील आणि भित्‍तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 25 :- मतदारामध्ये मोठया प्रमाणात जनजागृती होण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी साजरा करण्यात येतो. आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने 12 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी उपस्थितांना राष्‍ट्रीय मतदार दिनाची शपथ देवून, लोकशाही बळकट करण्‍यासाठी मतदारामध्‍ये मोठया प्रमाणात जन जागृती करणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. 

जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे मार्गदर्शनाखाली यावर्षीचा 12 वा राष्ट्रीय मतदार दिन कोविड -19 संदर्भात शासनाने निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्‍हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उप जिल्‍हाधिकारी प्रदीप कुलकर्णी व उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी श्रीमती दीपाली मोतीयेळे, उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य) श्रीमती संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी भोकर राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसिलदार किरण आंबेकर व अधिकारी /कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

यावेळी जिल्ह्यातील नवमतदार, दिव्‍यांग, बेघर मतदार यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते मतदान ओळखपत्राचे वाटप करण्‍यात आले. उत्‍कृष्‍ट मतदार नोंदणी अधिकारी म्‍हणून राजेंद्र खंदारे, उत्‍कृष्‍ट निवडणूक नायब तहसिलदार म्‍हणून श्रीमती उर्मिला कुलकर्णी, उत्‍कृष्‍ट बीएलओ म्‍हणून राजेंद्र कळसे व आर सी दंडेकर यांना मान्‍यवरांचे हस्‍ते मानचिन्‍ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले. राज्‍य स्‍तरावरील लोकशाही भोंडला स्‍पर्धेतील विजेत्‍या श्रीमती डॉ. उज्‍वला सदावर्ते यांनाही मान्‍यवरांचे हस्‍ते मानचिन्‍ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले. जिल्‍हा व तालुकास्‍तरावर राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निवडणूक प्रक्रिया व मतदान अधिकार याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध स्‍पर्धेतील विजेत्‍यांना मानचिन्‍ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले. 

प्रास्‍ताविक उपजिल्‍हाधिकारी निवडणूक श्रीमती दीपाली मोतीयेळे यांनी केले तर सूत्र संचालन नायब तहसिलदार श्रीमती स्‍नेहलता स्‍वामी यांनी केले. आभार प्रदर्शन तहसिलदार किरण आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाच्‍या यशस्वी करण्यासाठी नायब तहसिलदार देविदास पोटे, नायब तहसिलदार श्रीमती स्नेहलता स्‍वामी / श्रीमती उर्मिला कुलकर्णी निवडणूक शाखेतील अधिकारी /कर्मचारी व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. जि.प. वाघी शाळेतील स्‍काऊट गाईड विद्यार्थींनीही या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

0000





No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...