Thursday, September 5, 2024

 वृत्त क्र.  811 

गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत साजरे करा :  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 शांतता समितीची बैठक ;उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन 

एक गाव एक गणपती संकल्पना, ध्वनी प्रदूषण मुक्त उत्सव राबविण्यावर भर दयावा 

नांदेड दि. 5 सप्टेंबर :-  गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जिल्ह्यात हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज शांतता समितीच्या बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव,   तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यासह शांतता समितीचे सदस्य व इतर सदस्यांची उपस्थिती होती. 

सोशल मिडियाच्या अफवांना दुर्लक्ष करा 

जिल्ह्यात गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सोशल माध्यमावरील संदेशामुळे जिल्ह्यात शांततेचा भंग होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी. याबाबत अगोदर सोशल माध्यमावरील संदेशाची सत्यता तपासून मगच प्रतिक्रिया द्यावी. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची दक्षता प्रत्येक नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. कोणत्यातरी वर्षा मधल्या कुठल्यातरी व्हिडिओमुळे संदेशामुळे किंवा पोस्टमुळे आपल्या आजूबाजूंच्या लोकांमध्ये अफवांचा बाजार पसरणार नाही यावर नियंत्रण ठेवण्याचे ही आवाहन त्यांनी केले. तसेच गणेश मंडळानी परवानगी घेवूनच गणेश मुर्तीची स्थापना करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. 

यावर्षी दोन्ही धर्मीयाचे सण एकत्र आले आहेत. दोन समाजाने या कालावधीत शांतता व संयम पाळून सण साजरे करावेत. गणपती मंडळानी समाजात तेढ निर्माण होणार नाहीत याची काळजी घेवून देखावे करावेत. तसेच ध्वनी प्रदुषणमुक्त गणेश उत्सव साजरा करण्यावर भर द्यावा ,असे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. नागरिकांनी स्वत: होवून नियम पाळले तर शांततेचा भंग होणार नाही. प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून सण आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्ह्यात एक गाव एक गणवती या संकल्पनेवर भर द्यावा, एकोपा ठेवून सामाजिक सलोखा ठेवावा, गणेश मंडळानी विसर्जनाचा मार्ग प्रशासनास कळावावा. सुरक्षितेच्या दृष्टीने गणेश मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याच्या सूचनाही पोलीस विभागाच्यावतीने देण्यात आल्या.  

मनपाच्यावतीने गणेश उत्सवादरम्यान करण्यात आलेल्या उपाययोजनाबाबत माहिती देण्यात आली. तसेच विसर्जनाच्या दिवशी संकलन केंद्र उभे करण्यात येणार असून नागरिकांनी गणेश मुर्ती संकलन केंद्रातच जमा कराव्यात, पीओपी व प्रतिबंधित मुर्त्यांची स्थापना करू नये मनपाच्यावतीने कळविण्यात आले आहे. 

यावेळी  गणेश उत्सवात विद्युत पुरवठा नेहमी सुरळीत राहील याची काळजी घेतली जाईल. दहा दिवसासाठी पुरविण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्याविषयी विद्युत विभागाच्यावतीने माहिती दिली. प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वाहनाची तपासणी नियमानुसार करुन प्रमाणपत्र निर्गमित केले जाईल. याबाबत पुरविण्यात येणाऱ्या सेवा वेळेत देण्याबाबत माहिती दिली.शांतता समितीच्या सदस्यांनी गणेश उत्सव व ईद ए मिलाद या सणामध्ये येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या निवारण्यासाठी संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगितले. सण उत्सवाच्या काळात शांतता समितीचे सदस्य व सर्व सामाजिक नेत्यांनी आपापल्या समूहात, मोहल्यात, गावात, नगरात शांतता राहील यासाठी स्वतः प्रयत्न करावे. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.                            

00000











No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...