वृत्त क्र. 875
नेरली येथे अतिसाराचे २७३रूग्ण आढळले
६ रुग्ण अत्यवस्थ ; आरोग्य यंत्रणा कार्यरत
५० आरोग्य कर्मचारी गावामध्ये कर्तव्यावर
दूषित पाणी पुरवठयाचे नमुने प्रयोगशाळेत
नांदेड दि. २८ सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील तीव्र अतिसाराच्या उद्रेकात २७३ नागरिकांना लागण झाली असून त्यांना जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय व शहराच्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा रुग्णअत्यवस्थ असून अन्य सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेचे परिस्थितीवर नियंत्रण असून गावामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्या नेतृत्वात सहा वैद्यकीय चमू कार्यरत आहे. यामध्ये जवळपास 50 आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गावातील नागरिकांनी आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार गावांमधील दूषित पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्हा यंत्रणेने विशेष आरोग्य शिबिर गावात लावले आहे.
सद्यस्थिती संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सांकडून आलेली अधिकृत माहितीनुसार सर्व रुग्णांची परिस्थिती धोक्याबाहेर आहे. मात्र 273 पैकी सहा रुग्ण गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 90 तर अन्य रुग्ण विष्णुपरी येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात आहे.
जिल्हा यंत्रणेला या संदर्भातील माहिती काल कळल्यानंतर रात्रीपासून या संदर्भातील उपचार सुरू झाले आहे. आरोग्य पथकाने उपकेंद्रावर एकूण २५६ रुग्णांची तपासणी केली.त्यापैकी ९९ रुग्णांना उच्च केंद्रात पाठवण्यात आले.इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
गावात नळ योजनेतून पाणीपुरवठा होत असून त्यातून प्रादुर्भाव झाला अथवा काय यासाठी प्रयोग शाळेला नमुने पाठविण्यात आले आहे. पूर्वी साठवलेले जलस्रोत रिकामे केले गेले.गावात सध्या 4 पाण्याचे टँकर पोहोचले आहेत, पाण्याच्या टँकरचे क्लोरीनेशन करून ओटी टेस्ट करून गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात आहे.
गावपातळीवर रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली जिल्हा व तालुका जलद प्रतिसाद पथक घटनास्थळी सकाळीच पोहोचले असून शमन उपाययोजना केल्या आहेत. 5 आरोग्य पथकांसह घरोघरी सर्वेक्षण सुरू. 4 आरोग्।य पथके सध्या गावात औषधांसह उपस्थित आहेत.
गावातील नागरिकांनी स्वच्छते संदर्भात आरोग्य यंत्रणेचे निर्देश दिले आहेत त्याचे पालन करावे. गावातील विहिरी व अन्य स्त्रोतांद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा वापर सध्या करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment