Saturday, December 17, 2016

नगरपरिषद , नगरपंचायत निवडणुकीसाठी
आज मतदान , निवडणूक यंत्रणा सज्ज
सकाळी 7.30 वा. पासून मतदानास प्रारंभ
नांदेड, दि. 17 :-  राज्य निवडणूक आयोगाकडून नांदेड जिल्ह्यातील 9 नगरपरिषद व 2 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या 9 नगरपरिषदांच्या अध्यक्षांची निवडही थेट मतदानाद्वारे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी निवडणूक यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे. मतदारांनी निर्भय आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे यासाठी यंत्रणांनी काटेकोर व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील (कंसात प्रभाग संख्या) देगलूर (12), धर्माबाद (09), बिलोली, कुंडलवाडी, उमरी, मुखेड, कंधार, हदगाव, मुदखेड (प्रत्येकी 08) या नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तसेच अध्यक्ष पद निवडीसाठी आणि माहूर व अर्धापूर (प्रत्येकी 17) नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 या वेळेत मतदान होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 283 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. नगरपरिषद व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या जागांसाठी 793 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर नगर परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 53 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक तसेच निवडणूक निरिक्षक म्हणून चार असे पाच अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. याशिवाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक अधिकारी असे एकूण 33 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय 72 क्षेत्रीय अधिकारी, 1 हजार 711 कर्मचारी यांच्यासह अतिरिक्त 1 हजार 821 मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. मतदानासाठी 778 मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी पात्र मतदारांची संख्या 2 लाख 5 हजार 5 इतकी आहे. या निवडणुकीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश देण्यात आले आहेत.                             0000000

No comments:

Post a Comment

  ​ वृत्त क्रमांक 38   ​ उमरीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिनाचे रविवारी आयोजन   नांदेड दि.   10   जानेवारी :- उमर...