Saturday, January 6, 2018

वंचितांना न्याय देण्यासाठी
पत्रकारांनी समाजाचे नायक व्हावे  
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पणदिन निमित्त अभिवादन
नांदेड,दि. 6 :- वंचित घटकांना न्याय देण्यासाठी पत्रकारांना समाजाचा नायक या भुमिकेतून सकारात्मक दृष्टीने काम करावे लागेल, असा सूर आज येथे व्यक्त झाला. निमित्त होते दर्पण दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय नांदेड आणि महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे. अध्यक्षस्थानी महात्मा गांधी मिशन संस्थेतील संगणक शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शिरीष कोडगीरे होते.
एमजीएम शिक्षण संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार देवदत्त तुंगार, अनिकेत कुलकर्णी, आकाशवाणीचे सहायक निदेशक भिमराव शेळके, सकाळचे सहयोगी संपादक संजय कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे लातूर विभागाचे सचिव तथा सामनाचे प्रतिनिधी विजय जोशी, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी मीरा ढास, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, वृत्तपत्र विद्या  माध्यमशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.गणेश जोशी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास विविध माध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील पत्रकारितेचे विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री. कोडगीरे म्हणाले, मागील दहा ते पंधरा वर्षाच्या काळापासून माध्यम क्षेत्रात संगणकशास्त्राने मोठी क्रांती केली असून इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे सोशल मिडिया हातात असला तरी नागरिकांमध्ये वृत्तपत्र वाचनाची आवड आजही आहे. वृत्तपत्र माध्यमाचे महत्व टिकून ठेवण्यामागे पत्रकारांचा खूप मोठा त्याग आहे. त्यामुळे सकारात्मक पत्रकारितेतून सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याची संधी मिळते, असे सांगितले.
प्रा. तुंगार यांनी पत्रकारांनी कमीत कमी शब्दात चांगली बातमी लिहिण्याचे कौशल्य आत्मसात करुन इतर महत्वाच्या बातमीला जागा दिली पाहिजे. तर जुन्या पिढीने नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत केले पाहिजे.  असे सांगितले. अनिकेत कुलकर्णी यांनी, जीवनात अभिमानाचे क्षण जास्त यावे तर आत्मपरिक्षणाचे क्षण कमी यावे यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले. श्री. शेळके म्हणाले, पत्रकारांनी लिखाणामधून इतरांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. सकारात्मकदृष्टी ठेवली तर संकट येत नाहीत. अशिक्षित व्यक्तीला  छायाचित्रातून बातमीचा अंदाज येतो तर एका छायाचित्रातून कांदबरी निर्माण होते. आकाशवाणीत लिहिण्याची व बोलण्यातून काम करण्याच्या अनेक संधी आहेत असे सांगून जाहिरात व वृत्त मांडणी, मुलाखतीचे तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. संजय कुलकर्णी म्हणाले, पत्रकार हा मुकनायक असला पाहिजे. पत्रकारिता हे क्षेत्र त्यागाचे असून इतरांना प्रेरीत करण्याचे काम आहे. पत्रकारांनी सकारात्मक दृष्टी ठेवून लिखाण केल्यास समाजात चांगला संदेश जातो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारितेची गती वाढली असून या क्षेत्रात निरंतर वाचनाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. विजय जोशी यांनी दर्पण दिनाचे महत्व सांगून आचार्य बाळशास्त्री यांच्या सामाजिक जाणीवेतून केलेल्या कार्याची माहिती दिली. वैचारीक ताकद वृत्तपत्रात असून जनमाणसाचा आरसा म्हणून वृत्तपत्रे काम करत आहेत, असे सांगून वाचा म्हणजे वाचाल अशा संदेश त्यांनी दिला. प्र. जिल्हा माहिती अधिकारी श्रीमती मिरा ढास यांनी दर्पण दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची भुमिका स्पष्ट केली. छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी वृत्तपत्रातील छायाचित्राचे महत्व सांगितले.
प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन तसेच दिपप्रज्वलन करण्यात आले. महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी प्रकाशित केलेल्या स्पंदन भित्तीपत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविकात केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद आदींचीही उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार ऋषीकेश कोंडेकर यांनी सुत्रसंचलन केले तर प्रा. राज गायकवाड यांनी आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...