Friday, July 16, 2021

 

जिल्ह्यातील 91 गावांना स्मशानभूमीसाठी शासकीय जागा प्रदान

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा बैठकीत दिले होते निर्देश 

नांदेड (जिमाका) दि. 16 :- जिल्ह्यातील काही गावात स्मशानभूमीचा प्रश्न हा भावनिक आणि तितकाच महत्वाचा होता. अनेक खेड्यांना स्वत:ची स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांची होणारी विवंचना लक्षात घेवून "गाव तेथे स्मशानभूमी" अंतर्गत जवळपास 91 खेड्यांना शासकीय जागा प्रदानचे आदेश आज काढण्यात आले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रश्नाचा आढावा घेऊन जिल्हा परिषद व महसूल विभागाने समन्वय साधून हा जागेचा विषय मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते.  

अर्धापूर, उमरी, कंधार, किनवट, देगलूर, धर्माबाद, नांदेड, बिलोली, भोकर, माहूर, मुखेड, मुदखेड, हदगाव या तालुक्यामध्‍ये स्मशानभूमी नसलेल्या खेड्याची संख्या लक्षणीय होती. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशानुसार गत सहा महिन्यापासून जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनातर्फे प्रशासकीय स्तरावर आवश्यक असलेली मंजुरी व प्रक्रीया युध्दपातळीवर पुर्ण करण्यात आली. जवळपास 91 खेड्यांचा स्मशानभूमीचा प्रश्न आता मार्गी लागला आहे.  

जिल्ह्यातील साधारणता 300 खेड्यांपेकी 91 गावांचे आदेश पारीत करण्यात आले असून उर्वरित 209 गावांच्या स्मशानभूमीचे आदेशही लवकर वितरीत केले जाणार आहेत. गावातील स्मशानभूमी ही अधिकाधिक वृक्षवल्ली व स्वच्छतापूर्ण असावी यासाठी त्या-त्या गावातील ग्रामस्थांचा सहभागही अत्यंत आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहे. 

जिल्ह्यातील तालुकानिहाय स्मशानभूमी आदेश पारीत झालेल्या गावे पुढीलप्रमाणे आहेत. अर्धापूर तालुक्यातर्गंत 3, उमरी तालुक्यातर्गंत 2, कंधार तालुक्यातर्गंत 2, किनवट तालुक्यातर्गंत 17, देगलूर तालुक्यातर्गंत 7, धर्माबाद तालुक्यातर्गंत 1, नांदेड तालुक्यातर्गंत 4, बिलोली तालुक्यातर्गंत 7, भोकर तालुक्यातर्गंत 10, माहूर तालुक्यातर्गंत 20, मुखेड तालुक्यातर्गंत 6, मुदखेड 4, हदगाव तालुक्यातर्गंत 8 याप्रमाणे एकूण 91 गावांचा समावेश आहे.



00000

 

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...