Monday, June 3, 2024

वृत्त क्र. 457 दि. 1 जून 2024

नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन

जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती

नांदेड,१- आज शनिवार दिनांक १ जून रोजी नांदेड पंचायत समितीला नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन मिळवणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या पंचायत समितीचा मान नांदेड पंचायत समितीला मिळाला आहे़.  

    यानिमित्त नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी पांडुरंग नारवटकर,  आयएसओ मानांकन परीक्षक योगेश जोशी, अनिल येवले, शुभम तेलेवार आदींची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. इतर पंचायत समितीने देखील प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना प्रदान करण्यात आले.

     नांदेड पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर  विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सामान्य प्रशासन, शिक्षण, पंचायत, कृषी व पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालविकास, रोजगार, स्वच्छता व पाणी पुरवठा आदी विभागामध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीची दखल या मानांकनावेळी घेण्यात आली. कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यासह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून नांदेड पंचायत समितीने मानांकन मिळविले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळविणारी जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती नांदेड ठरली आहे. या कार्यक्रमाला ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे, रणजित हाटकर, श्रीनिवास मुगावे, संजय रामोड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कार्यालयीन कर्मचारी, सरपंच व ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी विठ्ठल कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन गोविंद मांजरमकर यांनी केले.

000000











No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...