वृत्त क्रमांक 295
अतिदक्षता विभागातील वातानुकुलित यंत्राची लवकरात लवकर दुरुस्ती
पर्यायी व्यवस्था केली असून रुग्णांची गैरसोय होणार नाही –अधिष्ठाता
नांदेड, दि. 16 मार्च :- समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही व्हीडीओने विचलित न होता नागरिकांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरील आपला विश्वास कायम ठेवावा. गरीब गरजू लोकांसाठी दर्जेदार उपचाराचे केंद्र म्हणूनही हे रुग्णालय काम करते व भविष्यात ही करेल असा विश्वास डॉ. शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिला.
मागील काही दिवसापासून अतिदक्षता विभागाकडील वातानुकूलीत यंत्र ( एसी )बंद आहेत. या वातानुकुलित यंत्रांची देखभाल व दुरुस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येते. हे वातानुकुलित यंत्र दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेशी लेखी स्वरुपात संपर्क केला आहे. या वातानुकुलित यंत्राच्या दुरुस्तीसाठी लागणारे स्पेअर पार्टस हे निविदा प्रक्रीयेद्वारे खरेदी करण्यात येणार आहेत. लवकरात लवकर प्रक्रीया राबवून दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे अभियंता विद्युत शाखा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी अधिष्ठाता डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना कळविले आहे.
आज 16 मार्च 2025 रोजी अभियंता विद्युत शाखा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार यांनी दुरुस्तीचे काम सुरु झालेले असून लवकरच पूर्ण करण्यात येईल. त्या अनुषंगाने रुग्णसेवेबाबत रुग्णालय प्रशासन विभागामार्फत विविध अतिदक्षता विभागात स्टॅन्ड फॅन लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णाची गैरसोय होणार नाही व रुग्णांना कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. याबाबत रुग्णालय प्रशासनाचे पुर्णपणे त्वरीत व्यवस्था करण्यात आलेली आहे. याबाबत रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम झालेला नाही अशी माहिती डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment