Tuesday, April 22, 2025

 वृत्त क्रमांक 418

तीन दिवस येलो अलर्ट जारी

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण, दमट हवामान राहण्याची शक्यता  

नांदेड दि. 22 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23, 2425 एप्रिल 2025 हे तीन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. या तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. याबाबत खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

काय करावे

सर्वांसाठी अत्यावश्यक

·         तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. अपस्मार, हृदयरोग, मूत्रपिंड, यकृतविषयक आजारांमुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे.

·         ओआरएस म्हणजेच तोंडान घ्यावयाचे शरीरातले पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक, नारळाच पाणी घ्या. हलक्या रंगाचे, वजनाला हलके आणि सैलसर सुती कपडे वापरा.

·         घराबाहेर असाल तर डोके झाका. एखादे कापड वापरा, टोपी घाला किंवा छत्री वापरा. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीन वापरा.

·         अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तींची विशेष काळजी घ्या.

नोकऱ्या देणारे आणि कामगार यांच्यासाठी

·         कामाच्या जागी पिण्याचे थंड पाणी पुरवा.

·         सर्व कामगारांसाठी विश्रांतीसाठी जागा, स्वच्छ पाणी, ताक, प्रथमोपचार पेटी, आईस पॅक आणि ओआरएसही ठेवा.

·         थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात यायचे टाळा, हे कामगारांना बजावा.

·         कामाची आखणी अशी करा की, ताणाच्या श्रमाच्या कामांसाठी दिवसातला तुलनेने कमी वेळ निवडला जाईल.

·         उघड्यावर काम करणाऱ्यांना विश्रांतीच्या वेळा अधिक ठेवा आणि कालावधीही वाढवा.

·         अतिउष्णतेच्या क्षेत्रात नव्याने काम करत असलेल्या कामगारांना हलके काम द्या, कामाचे तास कमी ठेवा.

·         गरोदर महिला आणि आजार असलेल्या कामगारांकडे अधिक लक्ष द्या.

तुलनेनं थंड घरासाठी

·         सूर्यप्रकाश परावर्तित करणारा पांढरा नग वापरा, छत थंड ठेवणारं तंत्रज्ञान, हवेशीर, हलके, थर्मोकोलचे आवरण वापर ज्याद्वारे कमी किमतीत थंडपणा राखता येईल. छतावर गवत वाढवा किंवा हिरवेगार होईल हे बघा.

·         उष्णता बाहेरून आत येण्याऐवजी टी बाहेरच फेकली जावी, यासाठी तात्पुरते अल्युमिनियम आच्छादित पुट्ट्यांसारखे परावर्तक खिडक्यांवर बसवा.

·         घर थंड ठेवा, गडद रंगाचे पडदे वापरा. रात्री काळ्या काचा, उन्हापासून बचावाची सोय असलेली छते, खुल्या खिडक्या असू द्या. शक्यतो सर्वात खालच्या मजल्यावरच राहा.

·         हरित छप्पर, हरित भिंती, घरांतर्गत वनस्पती इमारत नैसर्गिकरीत्या थंड बनवून उष्णता कमी करतात. त्याद्वारे वातानुकूलन यंत्रणेचा वापर कमी होऊन उष्णताही बाहेर फेकली जात नाही.

·         वातानुकूलन यंत्राचे तापमान २४ डिग्री अंश किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा. यातून विजेचे बिलही कमी येईल आणि आरोग्यही चांगले राहील.

पशुधनासाठी

·         पशुधन सावलीच्या छताखाली ठेवा आणि त्यांना भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या.

·         त्यांच्याकडून सकाळी 11 ते दुपारी 4 काम करून घेऊ नका.

·         प्राण्यांच्या आसऱ्याच्या ठिकाणी छतावर स्ट्रॉच्या नळ्यांनी आच्छादन करा, त्याला पांढरा रंग द्या किंवा शेणाच्या प्लास्टरद्वारे तापमान कमी करा.

·         पशुधनाच्या शेडमध्ये पंखे, पाण्याचे फवारे आणि फेस तयार करणारे यंत्र वापरा.

·         अतिउष्णतेच्या वेळी पाण्याचे फवारे मारा आणि प्राण्यांना जवळच्या पाण्याच्या स्त्रोतावर थंड करण्यासाठी न्या.

·         त्यांना हिरवे गवत, प्रोटीन फॅटला फाटा देणारा पूरक आहार द्या, मिनरल्सचे मिश्रण आणि मीठ द्या. तुलनेनं थंड हवेत त्यांना चरू द्या.

काय टाळावे

·         उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी १२ ते ०३ मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा.

·         अनवाणी बाहेर जाऊ नका.

·         अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. दारं खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील हे बघा.

·         अल्कोहोल म्हणजे दारू, चहा, कॉफी, शीतपेये टाळा त्यातून शरीरातले पाणी कमी होते.

·         उच्च प्रथिनयुक्त मिठाचं प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका. शिळंपाकं खाऊ नका.

·         चारचाकी वाहन लावून ठेवताना त्यात लहान मुले किंवा प्राणी ठेऊ नका.

·         चमकणारे दिवे किंवा बल्ब्ज वापरू नका, त्यातून अनावश्यक उष्णता निर्माण होते.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.  696     जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाची बैठक संपन्न   नांदेड ,  दि. 3 जुलै :- जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाच...