Thursday, March 7, 2024

 वृत्त क्रमांक 216

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा जीवंत आविष्कार

गुरुद्वारा मैदानावर, 9,10,11 मार्चला शिवगर्जना महानाट्य

 

·         हा 'विकेंड ' शिवचरित्राला रंगमंचावर बघण्यासाठी राखीव ठेवा

·         जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण ; सर्वांसाठी प्रवेश निशुल्क

·         महानाट्य बघण्यासाठी नियमित बस भाडे आकारून फेऱ्यांची सुविधा

·         आज आकाशवाणीवर ऐका 'शिवगर्जना ' चे वैशीष्टय

 

नांदेड, दि. 7 : छत्रपती शिवाजी महाराजाचे जीवन चरित्र म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या चित्तथरारक घटनाक्रमांचा चढता आलेख. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात जगण्याची उमेद निर्माण करणाऱ्या या जीवन प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी शासनामार्फत आयोजित शिवगर्जना या छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रावरील आधारित महानाट्याचा आनंद घेण्यासाठी हा 'विकेंड', राखीव ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य शिवगर्जनाचा प्रयोग होत आहे. 9, 10 व 11 मार्च रोजी गुरुद्वारा मैदान हिंगोली गेट रेल्वे हॉस्पिटल समोर दररोज 6:30 वाजता महानाट्याच्या प्रयोगाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांपैकी एक दिवस प्रत्येक कुटुंबाने या महानाट्याचा अवश्य लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

 

ग्रुप शो साठी बसेसची व्यवस्था

नियोजन भवन नांदेड येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यातील तमाम नागरिकांना या नाट्य महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.हदगाव, नरसी-नायगाव, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार, उमरी, भोकर या ठिकाणावरुन प्रेक्षकांना नांदेडला येण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी नांदेड बसस्थानकावरुनही जादा बसेसची सोय करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, ज्या ठिकाणावरून अशा पद्धतीने गटाने प्रवासी या नाटकासाठी येत असतील त्यांना नियमित बस भाडे आकारून बसेस उपलब्ध केल्या जातील. 8055511199,9822409932 या क्रमाकांवर एसटी महामंडळाशी संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

 

विविध संघटनांना आवाहन

दररोज दहा हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे . प्रत्येक शाळेने या संदर्भातले दिवस वाटून घेतले असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. अंगणवाडी सेविका, जिल्ह्यातील सर्व बचत गट सदस्य, आशा वर्कर व जिल्हा प्रशासनाच्या सेवेत असणाऱ्या आरोग्य यंत्रणा, विविध सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, उद्योजक तसेच समाजातील सर्व घटकांना सन्मानपूर्वक आमंत्रित करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात तयार झालेल्या आयोजन समितीला दिले आहेत. जिल्हाभरातील शाळांनी या संदर्भातील आपापले नियोजन करावे पाचवी इयत्ता वरील मुलांनी शाळेच्या शिक्षकांसोबत तर त्यापेक्षा लहान मुलांनी आपल्या कुटुंबासोबत शिवछत्रपतींचा इतिहास याची डोळा बघावा. प्रत्येकाने आपल्या घरातील मुलाला या इतिहासाचे साक्षीदार व्हायची संधी द्यावी, असे आवाहन केले आहे.

 

उत्तम बैठक व्यवस्था

राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित हे महानाट्य नांदेड जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत राज्याचे ग्रामविकास पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सूचना केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने रसिक प्रेक्षकांसाठी सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध करण्याची तयारी सुरू केली आहे.  यासाठी वाहनतळ, रस्ते मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, बैठक सुविधा, जनजागृती आदि विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले. 

 

उंट, घोडे धावणार मैदानावर

आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत.  या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे.12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत  आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे.

 

कला क्षेत्रातील मान्यवरांनाही आवाहन

यासंदर्भात आज आणखी एक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या कक्षात घेण्यात आली. या बैठकीला जिल्ह्यातील नाट्य, नृत्य,कला,गीत ,संगीत क्षेत्रातील मान्यवर तसेच सांस्कृतिक कला क्रीडा क्षेत्रातील आयोजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दहा ते पंधरा वर्षाच्या अंतराने असा एक प्रयोग नांदेड शहरात होत असून या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद द्यावा असे आव्हान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी करावे असे आवाहनही यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱयांनी केले.

 

शुक्रवारी सकाळी रेडीओ कार्यक्रम

उद्या शुक्रवारी सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी शिवगर्जना या महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव यांची पत्रकार अनुराग पोवळे यांनी घेतलेली मुलाखत नांदेड आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येणार आहे.

शिवगर्जना महानाट्याचे ऐतिहासिक स्वरूप, संकल्पना, देशभरात झालेले प्रयोग याबाबतची माहिती या मुलाखतीतून पुढे येणार आहे.

00000






No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...