जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामीण भागातील अर्जांसाठी
मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित
नांदेड (जिमाका) दि. 23 :- लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या कक्षामार्फत सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने इत्यादीवर कार्यवाही करण्यात येते.
याबाबत राज्याचे मुख्य सचिवांनी नव्याने निर्देश निर्गमीत केले आहेत. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे यासंदर्भात वेळोवेळी निवेदने / अर्ज प्राप्त होतात. त्याअनुषंगाने प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय निर्देशाप्रमाणे सुरू करण्यात आले आहे.
जिल्हयातील उपलब्ध असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्यामधून आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा सदर मुख्यमंत्री सचिवालय कक्षासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या असून निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड हे या कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी असणार आहेत. त्यांच्या अधिनस्त नायब तहसिलदार करमणूक कर व पुरवठा विभागातील चार कर्मचाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. प्राप्त निवेदनांच्या तात्काळ निपटाऱ्यासाठी या चार कर्मचाऱ्यांकडे महसूली उपविभाग निहाय कामकाजाचे वाटप करण्यात आले आहे. याद्वारे नांदेड जिल्ह्यातील जनतेला त्यांचे अर्ज मा. मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-32 द्वारा मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड असे उद्देशून लिहिलेली अर्ज, जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आवक-जावक शाखेत सादर करुन त्याची पोच पावती घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जे अर्ज, संदर्भ व निवेदने यावर जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे संबंधीत जिल्हा स्तरावरील संबंधीत विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्यावर तातडीने कार्यवाही शासन स्तरावरील निर्देशान्वये करण्याच्या सुचना संबंधीत कक्षास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत. ज्या प्रकरणी शासन स्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी सर्व वैयक्तिक / धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई -32 यांना सादर करण्यात येतील.
00000
No comments:
Post a Comment