Friday, December 23, 2022

डॉ. शंकरराव चव्हाण भव्य कृषी प्रदर्शनाचे

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते माळेगाव येथे उद्घाटन संपन्न

डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण

नांदेड (जिमाका) दि. 23 :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत 22 ते 26 डिसेंबर कालावधीत कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन 22 डिसेंबर 2022 रोजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमनशेट्टे, महाराष्ट्र शासनाचे कृषि भुषण प्राप्त शेतकरी डॉ.शिवाजी शिंदे, आत्मा प्रकल्प उपसंचालक श्रीमती सोनवणे, जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) श्रीमती भाग्यश्री भोसले, मोहीम अधिकारी गजानन हुंडेकर, जिल्हा कृषि अधिकारी व्ही.एस. निरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील यांची उपस्थिती होती.

डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे यावेळी वितरण करण्यात आले. यामध्ये शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सन 2021-22 चे 16 व 2022-23 चे 16 असे एकूण 32 शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह, साडीचोळी, शाल, फेटा व प्रमाणपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. जिल्हयातील शेतकरी, कृषि निविष्ठा कंपनीचे प्रतिनिधी स्टॉलधारक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी कृषि विभागामार्फत आयोजित फळे, भाजीपाला, मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या गुणवत्ता पुर्ण पिकांच्या नमुन्याचे पाहणी करुन शेतकऱ्यांचे कौतुक केले.

या कृषि प्रदर्शनात एकूण 113 स्टॉल आहेत. ट्रॅक्टर, कृषि औजारे उत्पादक, बियाणे उत्पादक कंपनी, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, सेंद्रीय शेती उत्पादन, खाद्यपदार्थ, शेतकऱ्यांची शेती उत्पादने, नर्सरी, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, महाबीज, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, तालुका कृषि अधिकारी लोहा यांचे हे कृषि स्टॉल यात्रेच्या पाच दिवसांच्या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत स्टॉल सुरु राहणार आहेत. जिल्हा परिषद कृषि विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय फळे, भाजीपाला, मसाला पिकांचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध पिकांच्या शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या पिकांमध्ये स्पर्धा आयोजित केली आहे. उत्कृष्ट नमुन्याची निवड उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीमार्फत करण्यात येणार आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या उमेदवारांना अनुक्रमे 4 हजार रुपये, 3 हजार रुपये, 2 हजार रुपये बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत.

प्रास्ताविक कृषि विकास अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे यांनी केले तर सुत्रसंचालन राम कवडे यांनी केले. आभार कृषि अधिकारी सिकंदर पठाण यांनी मानले. हे प्रदर्शन आयोजनासाठी जिल्हा कृषि अधिकारी व्ही.एस. निरडे, पुंडलिक माने, माजी जिल्हा कृषि विकास अधिकारी संभाजी कऱ्हाळे, मोहीम अधिकारी गजानन हुंडेकर यांनी सहाय्य केले.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...