नांदेड जिल्ह्याच्या कोविड-19 व्यवस्थापनाचा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केला गौरव
नांदेड येथे बालकांच्या कोविड-19 वर कार्यशाळा संपन्न
नांदेड, दि. 15 (जिमाका) :- गतवर्षाच्या मार्चपासून सुरू झालेला कालखंड हा सर्वाधिक आव्हानात्मक आणि शासकीय सेवेतील सर्वांसाठी कर्तव्य तत्परतेचा कस लावणारा ठरला आहे. पहिल्या लाटेत आपल्या मराठवाड्यापर्यंतच बोलायचे झाले तर कोविड-19 मुळे चार ते साडेचार हजार लोकांना प्राणास मुकावे लागले. दुसऱ्या लाटेमध्ये सुमारे 11 हजार मराठवाड्यातील व्यक्तींना प्राण गमवावे लागले. स्वाभाविकच प्रशासनाच्या दृष्टीने हा अत्यंत आव्हानात्मक काळ होता. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती धोकादायक वळणावर पोहोचली होती. परंतु जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, खाजगी रुग्णालये व संपूर्ण टीमने मोठ्या कुशलतेने यावर मात करून जिल्ह्याला कोरोना धोक्यातून बाहेर काढले या शब्दात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा प्रशासनाचा गौरव केला.
लहान मुलांचा कोरोना या विषयावर आज डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, डॉ. नागेश लोणीकर आणि जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते.
कोरोनाचे हे आव्हान अजून संपलेले नाही. उलट तिसरी लाट जवळ येऊन ठेपली आहे. विशेषत: लहान मुलांसाठी ही लाट धोकादायक असल्याची भिती वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टिने शासनाच्या सर्व संबंधित विभाग, आरोग्य विभाग, बालरोग तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी अतिशय दक्ष होऊन युद्ध पातळीवर काम करण्यासाठी सज्ज व्हावे, असेही आवाहन त्यांनी केले.
कोविड-19 च्या प्रादुर्भावाबाबत नेमके जे होणार नाही असे वाटत होते त्या आव्हानांना प्रत्यक्षात सामोरे जावे लागले आहे. यात रुग्णांनाही असंख्य त्रास सहन करावा लागला. रुग्णांचे नातेवाईक यात सफर झाले. रेमडेसीवीर इंजेक्शनपासून ऑक्सीजन पर्यंत निर्माण झालेली आव्हाने विसरता येणार नाहीत. शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांसह खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी पहिले आलेले अनुभव लक्षात घेऊन अधिक अचूक वैद्यकीय सेवा आणि सुविधा रुग्णांना तात्काळ कशी उपलब्ध करुन देता येईल यावर भर देणे गरजेचे असल्याचे सुनिल केंद्रेकर यांनी स्पष्ट केले.
शासकीय सेवेचा भाग म्हणून कर्तव्य सारेच बजावत असतात. परंतु शासकीय सेवेच्या भूमिकेच्यापलिकडे एक मानवी संवेदना आणि आपल्या आयुष्याचे एक ध्येय निश्चित करुन जगणे महत्वाचे आहे. शासनात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपल्या जगण्याच्या ध्येयाला कोविड-19 अंतर्गत जी काही जबाबदारी येत आहे ती स्विकारुन यापुढेही अधिक सचोटीने, तत्परतेने पार पाडण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्या चुका झाल्या असतील त्याचेही शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयात कोविड-19 केंद्र चालविणाऱ्या सर्वांनी आत्मपरीक्षण करुन भविष्यात अशा चुका होणार नाहीत याचीही दक्षता घेतली पाहिजे. कोरोना काळातील ही जबाबदारी आव्हानात्मक जरी असली तरी आजची आपली सेवा रुग्णांच्या कित्येक पिढ्यांपर्यंत लक्षात राहिल हे डॉक्टरांनी विसरता कामा नये, असे केंद्रेकर म्हणाले.
दवाखाण्यातील व्हेंटीलेटर व इतर उपकरणे योग्य स्थितीत आहेत की नाहीत याच्या खातरजमेपासून ऑक्सीजनसह इतर औषधे व रेमेडेसीवीर सारख्या इंजेक्शनची मात्रा नेमकी किती व केंव्हा द्यावी याबाबत डॉक्टरांनी दक्षता घेतली पाहिजे. रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भावनिकता अधिक असते. या भावनिकतेला वैद्यकीय शिस्तीची जोड द्यावी लागेल. ही जबाबदारी सुद्धा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने जबाबदारीने पार पाडली पाहिजे, अशी अपेक्षा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या कार्यशाळेत सादर केल्या जाणाऱ्या विषयांची माहिती व नियोजन आपल्या प्रास्ताविकात सांगितले. नांदेड जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या मोठा जरी असला तरी परस्पर समन्वयातून व विश्वासर्हतेतून शासकिय व खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ मुलांच्या कोरोनाबाबत प्रभावी काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. नागेश लोणीकर यांनी लहान मुलांमधील कोरोना, डॉ. श्रीराम शिरमाने यांनी मल्टी सिस्टीम
इन्फ्लेमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन, डॉ. संदीप भोकरे यांनी नियोनेट, डॉ. सरफराज अहेमद यांनी ऑक्सीजन डिलेव्हरी सिस्टीम, डॉ. उमेश अत्रात यांनी इनपॉक्ट ऑफ कोविड-19 ऑन चाईल्ड मेंटल हेल्थ यावर भाष्य केले.
******
No comments:
Post a Comment