Friday, November 10, 2017

लेख_ ई-पॉस यंत्रणेद्वारे धान्य वितरणात नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर

ई-पॉस यंत्रणेद्वारे धान्य वितरणात
नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रणाली अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील गरीब लाभार्थ्यांना धान्य वितरण ई-पॉस यंत्रणेद्वारे नांदेड जिल्ह्यात करण्यात येत आहे. यामुळे गरजु लाभार्थी कुटुंबाला त्यांचे हक्काचे धान्य मिळत आहे. या तंत्रज्ञानामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक झाली आहे. ई-पॉस यंत्रणेद्वारे धान्य वाटपामध्ये नांदेड जिल्हा राज्यात दुसरा तर विभागात प्रथमस्थानी कायम आहे.
ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) यंत्रणेद्वारे बायोमॅट्रीक पध्दतीने सर्व रास्त भाव धान्य दुकानात धान्य वाटपामध्ये नांदेड जिल्ह्यानेही कात टाकली आहे. सार्वजनिक वितरण संगणकीकरण प्रणाली अंतर्गत शासनस्तरावरुन धान्य वाटपाबाबत अचुकता येण्यासाठी गरजु लाभार्थ्यांना धान्य देऊन त्याची पोच त्यांना तात्काळ प्राप्त होणे शक्य झाले आहे. धान्य वितरण प्रणालीमधील डिजीटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रत्येक लाभार्थी कुटूंबांला त्यांच्या हिश्याचे धान्य मिळत आहे. तसेच यामध्ये कोणतीही फसवणूक होत नाही, धान्य दिल्याबाबतची पोच पावती जागेवरच मिळते. कोणत्या लाभार्थ्यांना किती धान्य मिळेल याबाबतची माहिती ग्रामपातळीपासून ते मंत्रालयापर्यंत ऑनलाईन दिसणार आहे. ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) या तंत्रज्ञानामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक व सक्षम होण्यास मदत होणार आहे, यासाठी गावकऱ्यांची साथ मोठी आहे.  
            तालुका स्तरावर रास्त भाव दुकानदारांना या विषयाचे महत्व पटवून देवून मशीन हाताळणी ते आधारकार्ड व्हेरिफाईड ट्रान्झेक्शन यशस्वी होण्यासाठी दुर्गम भागातील अडचणी  दुर करुन प्रत्येक तहसील कार्यालयात एक सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे अचुक पध्दतीने व परिपूर्ण ट्राझेक्शन होण्यात यशस्वी झाले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रणालीतंर्गत ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) द्वारे अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यात आले आहे.
           
या ई-पॉस (ई-पॉईंट ऑफ सेल) द्वारे धान्य वितरणाचा शुभारंभ तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या हस्ते 16 जानेवारी 2017 रोजी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गोपाळवाडी येथे पार पडला. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाची शंभर टक्के आधार सिंडींग करण्यात आली आहे. या गावातील शालेय मुलांना महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले वाटप करण्यात आले असून लोकशाही दिन, भ्रष्टाचार निर्मुलन, लोकायुक्त, आपले सरकार आदी विषयातील प्रकरणे प्रलंबित नसलेले हे गोपाळवाडी गाव आहे.   
गावकऱ्यांना सार्वजनिक वितरण संगणकीकरण अंतर्गत ई-पॉस  योजनेचे महत्व पटवून देवून, प्रायोगिक तत्वावरील कामे नजीकच्या काळात सर्व दुकानांसाठी अंमलात आणुन लाभार्थ्यांसाठी अधिक सुलभता व पारदर्शकतेकडे पावले उचलण्यात येत आहेत. भविष्यात या मशिनद्वारे धान्य घेतलेल्या लाभार्थ्यांना ऑनलाईन बक्षिस मिळणार आहेत. याबाबत जनसमुदायामध्ये जनजागृती करुन योजनेचा हेतू साध्य करण्यात येणार आहे. अशी ही अविस्मरणीय तंत्रणाची वाटचाल सुरु झाली आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण सद्यस्थितीला रास्त भाव दुकानांची संख्या 1 हजार 988 असून रास्त भाव दुकानानुसार ई-पॉस मशिन वाटप करण्यात आले आहे. मार्च 2017 पासून ई-पॉस मशिनद्वारे धान्य वाटपास सुरुवात झाली आहे.
नांदेड तालुक्यातील बळीरामपुर येथील दुकानदार डी. आर. चिटमलवार  यांच्या दुकानातील कार्डधारक 292 आहेत. येथील माधव शिंदे यांनी या प्रणालीबाबत आम्ही खूप समाधानी असून खऱ्या गरजू लाभार्थ्यांनाच लाभ मिळतो आहे. आम्हाला लगेच त्याची पावती जसे की, योजनेतून किती धान्य वाटप झाले याची माहिती आमच्या हातात येते. गोर-गरिबांसाठी शासनाने उचलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. सार्वजनिक वितरण व्यवस्था संगणकीकृत करण्यामध्ये नांदेड जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले असून सर्व प्रशासकीय यंत्रणा, रास्त भाव दुकानदारांच्या सहकार्यामुळे या प्रणालीचा वापर यशस्वी ठरु शकला आहे.
- काशिनाथ आरेवार,

जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड .

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...