वृत्त क्रमांक
महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणातून शेतीला नवी दिशा !
• नांदेडमध्ये ‘महिला किसान दिन 2026’ कार्यशाळा; 16 तालुक्यांतील 290 महिला शेतकरी व कृषी सखींचा सहभाग
नांदेड(जिमाका), दि. 15: शेतीतील महिलांचे योगदान अधोरेखित करत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतीपूरक उद्योग, मूल्यवर्धन आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने ‘महिला किसान दिन 2026’ निमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), नांदेड आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील 16 तालुक्यांमधील 290 महिला शेतकरी व कृषी सखी सहभागी झाल्या.
शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून नऊ महिला शेतकऱ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तकुमार कळसाईत यांनी प्रास्ताविकात शेती क्षेत्रातील महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले. महिलांनी पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान, शेतीपूरक व्यवसाय आणि कृषिमालाच्या मूल्यवर्धनाचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
महिला शेतकऱ्यांचा सन्मान; उद्योग व स्वावलंबनावर भर
नांदेड, मुखेड आणि उमरी तालुक्यांतील महिला शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ‘महिला शेतकरी प्रमाणपत्रां’चे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र नोंदणी मोहिमेत विशेष पुढाकार घेऊन सर्वाधिक नोंदणी घडवून आणल्याबद्दल कंधार तालुक्यातील गऊळ येथील सौ. शिवकांता ज्ञानेश्वर हेंडगे आणि लोहा तालुक्यातील दापशेड येथील सौ. वैष्णवी विश्वनाथ होळगे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवनवार यांनी गृहउद्योग, प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र, पोखर्णी येथील विषय विशेषज्ञ सौ. अलका पवळे-पाटील यांनी महिलांचे आरोग्य, पोषण आणि संतुलित आहाराचे महत्त्व विशद केले. कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथील शास्त्रज्ञ सौ. प्रियंका खोले यांनी सूक्ष्म सिंचन, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या तंत्रज्ञानाची माहिती दिली.
जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक उद्योग अधिकारी अरविंद हांडे यांनी महिलांसाठीच्या शासकीय उद्योग योजना, अनुदान आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. कापूस संशोधन केंद्राचे तज्ज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी अवर्षणप्रवण परिस्थितीत उपयुक्त ठरणाऱ्या करडई पिकाचे सुधारित वाण, लागवड तंत्रज्ञान आणि खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका सौ. स्वाती बहीणजी यांनी ‘योगिक शेती’ संकल्पनेतून आत्मिक बळ, मानसिक शांतता आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व स्पष्ट करत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किनवटचे तालुका तंत्र व्यवस्थापक शिवप्रकाश पटवे यांनी केले, तर आत्माच्या प्रकल्प उपसंचालक अर्चना गुंजकर यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी जिल्ह्यातील तालुका तंत्र व्यवस्थापक, सहाय्यक तालुका तंत्र व्यवस्थापक तसेच आत्मा, पोकरा आणि स्मार्ट प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
***


.jpeg)
No comments:
Post a Comment