वृत्त क्रमांक
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
नांदेड(जिमाका), दि. 15: भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा सांख्यिकी अधिकारी अर्जुन झाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न तरुणाईच्या मनात रुजविणारे आणि आयुष्यभर वाचनाची आवड जोपासणारे डॉ. कलाम यांचे विचार नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकातून डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. उपस्थित मान्यवरांचे ग्रंथभेट देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले.
‘सततच्या वाचनातून बुद्धीचा विकास होतो,’ असे प्रतिपादन जिल्हा सांख्यिकी अधिकारी अर्जुन झाडे यांनी केले. नायब तहसीलदार सुनंदा कऱ्हाळे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत दररोज अवांतर वाचन करून ज्ञानात भर घालावी आणि जीवन समृद्ध करावे, असे आवाहन केले. यावेळी माहितीच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीनेही त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा 2026 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अभ्यासू व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या अभ्याससंचांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तांत्रिक सहायक प्रताप सूर्यवंशी यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून एस. के. शहाणे, श्रीनिवास इज्जपवार, संजय पाटील, अजय वट्टमवार, शंकर पवार, रोहित सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment