Thursday, October 15, 2026

 वृत्त क्रमांक

कीर्तनातून दुष्काळग्रस्त गावांत जनजागृतीचा जागर

• पाणीबचत, पशुधन संवर्धन, शेतकरी कल्याण आणि सामाजिक सुधारणांसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

नांदेड(जिमाका), दि. 15: दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या गावांमध्ये पाणीबचत, जलसंधारण, पशुधन संवर्धन, शेतकरी कल्याण आणि सामाजिक सुधारणांबाबत जनजागृती करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने कीर्तनकार, प्रवचनकार आणि समाजप्रबोधनकारांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या ‘अधिकृत प्रशासकीय आवाहन व मार्गदर्शिका 2026’च्या माध्यमातून कीर्तनाच्या प्रभावी लोकपरंपरेला समाजहिताच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत कीर्तन हे भक्तीबरोबरच लोकशिक्षण आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम राहिले आहे. अभंग, भारुडे आणि संतविचारांच्या माध्यमातून जलसंवर्धन, शासकीय योजनांची माहिती, सामाजिक जबाबदारी आणि संकटग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा संदेश गावागावांत पोहोचविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पाणीबचत आणि जलसंधारणावर भर

दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी आणि शेतीसाठी उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळणे, नळ व पाइपलाइनमधील गळती त्वरित निदर्शनास आणून देणे, पावसाचे पाणी साठविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे पुनर्भरण व पुनरुज्जीवन करण्याबाबत कीर्तनातून जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नव्या बोअरवेलच्या निर्मितीपेक्षा उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची मानसिकता निर्माण करण्यावरही भर देण्यात आला आहे.

पशुधन संवर्धनातून शेतकऱ्यांना आधार

दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे चारा व्यवस्थापन, चारा छावण्यांबाबतची माहिती आणि उपलब्ध शासकीय सुविधांचा लाभ घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘चारा मित्र’ संकल्पनेतून चारा व्यवस्थापनासाठी लोकसहभाग वाढविणे आणि पीक अवशेष योग्य प्रक्रियेद्वारे पशुखाद्य म्हणून वापरण्याबाबत जनजागृती करणे अपेक्षित आहे. ‘चारा वाचवा, पशुधन वाचवा’ हा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून जनमानसात रुजविण्यावर भर देण्यात आला आहे.

अनिष्ट प्रथांविरोधात समाजप्रबोधन

आर्थिक संकटाच्या काळात कुटुंबांवरील खर्चाचा ताण कमी करण्यासाठी विवाहसोहळ्यांतील अनावश्यक खर्च टाळणे, सामूहिक विवाहांना प्रोत्साहन देणे आणि बचतीचा विनियोग मुलांच्या शिक्षणासाठी करण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हुंडाप्रथा, बालविवाह आणि व्यसनाधीनतेविरोधात समाजप्रबोधन करणे, मुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यांना प्रोत्साहन देणे, तसेच व्यसनाधीन व्यक्तींना अपमानित न करता उपचारासाठी प्रेरित करणे, या बाबींनाही मार्गदर्शिकेत महत्त्व देण्यात आले आहे.

मानसिक आरोग्याबाबत संवेदनशीलतेचा संदेश

दुष्काळ, आर्थिक विवंचना आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे शेतकरी कुटुंबांवर मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तींचे म्हणणे समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि गरजेनुसार तज्ज्ञांची मदत उपलब्ध करून देणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आत्महानीचे विचार व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना दोष न देता त्यांना आधार देणे, एकटे न सोडणे आणि योग्य मदतीपर्यंत पोहोचविण्याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अनुषंगाने मार्गदर्शिकेत शिवार हेल्पलाइन 8955771115, राष्ट्रीय मानसिक आरोग्य हेल्पलाइन ‘टेली-मानस’ 14416, रुग्णवाहिका सेवा 108 आणि पोलीस मदत क्रमांक 112 यांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्याचे नमूद करण्यात आले आहे.

कीर्तनातून सामूहिक संकल्प

कीर्तनाच्या समारोपावेळी ग्रामस्थांकडून पाणीबचत व जलव्यवस्थापन, शेतकरी आणि पशुधन संवर्धन, शासकीय मदतीसाठी अधिकृत कार्यालयांशी संपर्क, अनावश्यक सामाजिक खर्चाला आळा, बालविवाह व व्यसनांना नकार आणि संकटग्रस्त कुटुंबांना मानसिक आधार देणे, अशा विषयांवर सामूहिक संकल्प करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संतपरंपरेतील समता, करुणा आणि मानवतेचा संदेश आजच्या सामाजिक आव्हानांशी जोडून लोकसहभागातून ग्रामविकासाला चालना देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीला कर्तव्याची जोड देत जलसंवर्धन, शेतकरी कल्याण आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश गावागावांत पोहोचविण्यासाठी कीर्तनकार व ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

**

No comments:

Post a Comment

  वृत्त क्रमांक पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड दौरा   दुष्काळी परिस्थिती व पाणीपुरवठा योजनांचा घेणार आढावा पशुधनासाठी चारा ...