वृत्त क्रमांक
‘चारा मित्र’ संकल्पनेतून पशुधनासाठी चारा सुरक्षितता; पशुपालकांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
कमी पाण्यात, लवकर येणाऱ्या चारा पिकांचे बियाणे प्रशासनाकडून उपलब्ध करून देणार
नांदेड (जिमाका), दि. १४ : अल्-निनोच्या प्रभावामुळे पाणीटंचाईची शक्यता असून आगामी काळात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई भेडसावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘चारा मित्र’ ही संकल्पना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्वतःच्या शेतात पाण्याची उपलब्धता असलेल्या आणि चारा पिकांची लागवड करण्यास इच्छुक व्यक्तींना प्रशासनामार्फत कमी पाण्यात व लवकर येणाऱ्या चारा पिकांच्या वाणांचे बियाणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी अधिकाधिक पशुपालकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. चारा लागवडीसाठी इच्छुकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ‘चारा मित्र’ म्हणून नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी केले आहे.
अतिरिक्त चाऱ्याचा इतर पशुपालकांना होणार उपयोग
‘चारा मित्र’ संकल्पनेअंतर्गत लागवड करण्यात आलेल्या चाऱ्याचा प्रथम संबंधित पशुपालक आपल्या पशुधनासाठी वापर करू शकतील. त्यानंतर उपलब्ध होणारा अतिरिक्त चारा गरजू पशुपालकांच्या पशुधनासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर चाऱ्याची उपलब्धता वाढण्यास तसेच संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यात १८२ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत असून या दवाखान्यांमार्फत पशुपालकांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचविण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी विलंब न करता संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून नोंदणी करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पशुधन विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीत पशुधनाची हानी झाल्यास पशुपालकांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने पशुधन विमा योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत विमा हप्त्याच्या ८५ टक्के रकमेचे अनुदान शासनाकडून, तर उर्वरित १५ टक्के रक्कम संबंधित पशुपालकाने भरावयाची आहे. संभाव्य नैसर्गिक आपत्ती अथवा दुष्काळामुळे पशुधनाची हानी झाल्यास विम्याच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत मिळू शकते. त्यामुळे सर्व पशुपालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
सीएसआरच्या माध्यमातून पशुधन विम्यासाठी सहकार्याचे आवाहन
सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून अनेक उद्योग, संस्था व व्यक्ती विविध सामाजिक उपक्रमांना मदत करण्यास इच्छुक असतात. अशा उद्योग व संस्थांनी सीएसआर निधीतून गावातील पशुपालकांच्या पशुधनाचा विमा उतरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
कंधार तालुक्यातील बहादूरपुरा येथे एका कुटुंबाने संपूर्ण गावातील पशुधनाचा एक वर्षाचा विमा उतरवून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला होता. या उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवरही दखल घेण्यात आली होती. त्याच धर्तीवर इतर गावांमध्येही अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
३० ऑक्टोबरच्या सीएसआर कार्यशाळेत होणार नियोजन
जिल्ह्यातील सीएसआरच्या माध्यमातून कार्यरत उद्योग, संस्था व संबंधित घटकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. दि. ३० ऑक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सीएसआर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यशाळेत पशुधन विमा तसेच ‘चारा मित्र’ संकल्पनेसाठी सीएसआरच्या माध्यमातून करता येणाऱ्या सहकार्याबाबत नियोजन करता येणार आहे.
संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर ‘चारा मित्र’ उपक्रमात सहभागी होऊन चारा लागवडीसाठी पुढाकार घेणाऱ्या नागरिकांनी तसेच सर्व पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यांशी तातडीने संपर्क साधून नोंदणी करावी आणि पशुधन विमा योजनेचाही लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
***

No comments:
Post a Comment