वृत्त क्रमांक
जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी 22 ऑक्टोबरपासून ‘खेत बचाओ अभियान’
• 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यभर जनजागृती; संतुलित खत वापर, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीवर भर
• अभियान लोकचळवळ म्हणून राबवा
नांदेड(जिमाका), दि. 15: जमिनीचे आरोग्य सुधारणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर, जलसंधारण आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 22 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत राज्यभर ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत हे अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाकडून विभागीय व जिल्हास्तरीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
या अभियानांतर्गत माती परीक्षणावर आधारित खतांचा वापर, पीक विविधीकरण, पीक अवशेषांचे योग्य व्यवस्थापन आणि शाश्वत कृषी पद्धतींबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विद्यापीठांच्या समन्वयातून विविध उपक्रम राबविण्यात येतील.
अभियानाच्या माध्यमातून तेलबिया, कडधान्ये आणि फलोत्पादन पिकांना प्रोत्साहन देण्यासह भात कापणीनंतर पडीक राहणाऱ्या क्षेत्राचा कार्यक्षम वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच पीक अवशेष व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करून पराटी व पेंढा जाळण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करण्यात येणार आहे. सेंद्रिय व नैसर्गिक निविष्ठांचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाबाबतही प्रशिक्षण व प्रात्यक्षिके आयोजित केली जातील.
अभियानाच्या कालावधीत शेतकरी मेळावे, प्रक्षेत्र भेटी, प्रशिक्षण कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून मृदा आरोग्य पत्रिकेचा वापर, खतांचा संतुलित वापर, जलसंधारण, पाण्याचे पुनर्भरण व साठवणूक, तसेच ‘प्रति थेंब अधिक पीक’ या संकल्पनेचा प्रसार करण्यात येईल. यासोबतच शेतकरी ओळखपत्र तयार करणे व अद्ययावत करणे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग वाढविणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
राज्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी हे अभियान लोकचळवळ म्हणून राबवून शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी केले आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्ह्यातील कृषी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र आणि आत्मा कार्यालयाशी संपर्क साधून अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी, पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आणि शेती अधिक शाश्वत बनविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
**
No comments:
Post a Comment