Saturday, November 7, 2026

वृत्त क्रमांक

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा व पाणी उपलब्धतेची संयुक्त पाहणी

आंडगा (दक्षिण) येथे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची क्षेत्रीय भेट; ग्रामस्थांशी साधला संवाद

नांदेड, दि. ७ : जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज लोहा तालुक्यातील आंडगा (दक्षिण) येथे संयुक्त क्षेत्रीय भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

आंडगा (दक्षिण) येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मन्याड (लिंबोटी) धरणावरील विद्युत मोटारींचा वीजपुरवठा दररोज दोन ते तीन तास सुरू ठेवून जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी जनावरांसाठी चारा व पाण्याच्या उपलब्धतेबाबत तसेच विद्युत मोटारींच्या वीजपुरवठ्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीची माहिती घेतली.

परिसरात उपलब्ध असलेल्या वाळलेल्या चाऱ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत, निकृष्ट चाऱ्याचे पोषणमूल्य वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत तसेच पशुधनासाठी संतुलित आहार व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या संयुक्त पाहणीत जिल्हा उपआयुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. सखाराम खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रविणकुमार घुले, लोहा येथील तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे  सहाय्यक आयुक्त डॉ. अंकुश पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम बोदेमवाड उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी चारा व पिण्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासह ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली.

**







No comments:

Post a Comment

​ निमंत्रण मा. संपादक / प्रतिनिधी / स्ट्रिंजर, दैनिक वृत्तपत्र /  दूरचित्रवाणी / केबल टीव्ही, नांदेड जिल्हा. सस्नेह नमस्कार, ​ मा. उद्योग, ...