Monday, March 16, 2026

 वृत्त क्रमांक 327

पुस्तकामुळेच माणूस घडतो – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. 16 मार्च : माणसांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद पुस्तक वाचनात असते. कायदे किंवा नियमांच्या आधारे बदल घडवता येत नाहीत; ते स्वयंप्रेरणेनेच घडतात. त्यामुळे वाचनाची सवय प्रत्येकाने जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

नांदेड ग्रंथोत्सव 2025 च्या समारोप प्रसंगी (दि. 15 मार्च) ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अच्युत बन होते. व्यासपीठावर माजी जि.प. अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा कोषागार अधिकारी विक्रम देशमुख, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, निरीक्षक प्रताप सूर्यवंशी, राजेंद्र हंबीरे, गोविंद वडगावकर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, मला लहानपणापासून वाचनाची सवय आहे. पुस्तकावर केलेली गुंतवणूक आयुष्यात खूप काही देऊन जाते. लेखक आपल्या लेखनातून एकाच वेळी हजारो लोकांशी संवाद साधतात. आपण सर्व भाषांतील पुस्तके वाचली पाहिजेत. मराठी भाषेला मोठा साहित्यिक वारसा लाभला आहे. मोबाईलच्या युगात वाचन करणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखे आहे; मात्र हे आव्हान स्वीकारणे गरजेचे आहे.

कामाच्या व्यापातूनही वाचनाची सवय कायम ठेवत असल्याचे सांगत त्यांनी सेतुमाधव पगडी लिखित आणि कै. नरहर कुरुंदकर यांच्या प्रस्तावनेचे ‘छत्रपती शिवाजी’ हे पुस्तक सध्या वाचत असल्याचे सांगितले. तसेच या कार्यक्रमाला शासकीय सोपस्कार म्हणून नव्हे तर एक वाचक व ग्रंथप्रेमी म्हणून उपस्थित असल्याचेही त्यांनी नमूद केले. वाचन चळवळ वाढवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन वाचनाची गोडी लावावी, असे मत व्यक्त केले. माजी जि.प. अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे यांनी ग्रंथालयीन कर्मचारी अत्यंत कमी मानधनावर काम करत असून त्यांचे मानधन वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच ग्रंथालय क्षेत्रातील अडचणी सोडविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे व राजेंद्र हंबीरे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष डॉ. अच्युत बन यांनी मराठी भाषेचा वापर वाढविण्याचे आवाहन करत ‘बन साहित्य प्रतिष्ठान’च्या वतीने गेल्या पंचवीस वर्षांपासून साहित्यिक पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती दिली. वाचनाच्या आवडीमुळे जागतिक साहित्य संमेलन व इतर कार्यक्रमांसाठी आतापर्यंत ५५ देशांना भेट दिल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी ग्रंथोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्यांचा तसेच वाचकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद फाजगे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत तघडफल्ले यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी यांनी मानले.

000000





No comments:

Post a Comment

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण पूर्...