वृत्त क्रमांक 310
आदिवासी विद्यार्थ्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम
नांदेड दि. 19 मार्च :- आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल व खाजगी तथा मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा अंतर्गत इयत्ता अकरावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षेची तयारी करुन घेण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आयटीआय मधील अभ्यासक्रमांकना जास्तीत जास्त मुलांना प्रवेश घेणे सोयीस्कर शक्य होईल.
यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 10 वी नंतर 2 वर्ष कालावधीमध्ये नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या साह्याने शासकीय आश्रमशाळेमध्ये अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परिक्षांचे मार्गदर्शन करण्यात येणार असून निवड केलेल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपर आयुक्त नाशिक यांच्या शा.आ. शा.मुंढेबाव, बोपेगाव नाशिक प्रकल्पमध्ये इयत्ता 11 वीच्या 40 सीईटी, जेईइ व 40 नीटच्या मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे. अपर आयुक्त ठाणे यांच्या एकलव्य शेंडेगाव शहापूर प्रकल्प आश्रमशाळेत सीईटी, जेईइ 40 व नीटच्या 40 मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे. अपर आयुक्त अमरावती च्या शा. आ. शा चिंचघाट पांढरकवडा प्रकल्पात सीईटी, जेईइ 40 व नीटच्या 40 मुलांना तर नागपूर अपर आयुक्त कार्यालयाच्या शा.आ. शा. सिंधीविहार वर्धा प्रकल्पातील सीईटी व जेईइ 40 व नीटच्या 40 च्या मुलींना प्रवेश देण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण पात्रता पुढीलप्रमाणे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा असावा. अनुसूचित जमातीच्या यादीतील असावा व त्यासाठी प्रवेशावेळी जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्याच्या पालकांचे उत्पन्न 8 लाख रुपयेपेक्षा कमी असावे. या चाळणी परिक्षेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी त्याच शैक्षणिक वर्षात 10 वी उत्तीर्ण असणे आवाश्यक आहे.
या प्रकल्प कार्यालया अंतर्गत सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळा , एकलव्य निवासी शाळेतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी व नांदेड जिल्ह्यातील सर्व खाजगी तथा मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीचे विद्यार्थी जे मार्च-2025 च्या दहावीच्या परिक्षेस बसलेले आहेत. त्यापैकी मागील वर्षी म्हणजेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात जे विद्यार्थी इयत्ता 9 वी मध्ये गुणाक्रमे पहिले 5 आले असतील मुलींमध्ये गुणानुक्रमे पहिले 5 व मुलांमध्ये गुणाक्रमे पहिले 5 आलेले असे एकूण प्रत्येक शाळेतून 10 विद्यार्थी यांची निवड करण्यात येणार आहे. अशा प्रत्येक शाळेतून पहिले 5 मुले व पहिल्या 5 मुली यांची आवेदन पत्र विहित नमुन्यात व यादी संबंधीत शाळेचे मुख्याध्यापकांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट या कार्यालयात 30 मार्च 2025 पूर्वी सादर करावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांनी केले आहे.
विहित नमुन्यात माहिती सादर केलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा माहे मे 2025 मध्ये प्रकल्प कार्यालयाअंतर्गत एकूण प्राप्त आवेदनपत्रानुसार शासकीय आश्रमशाळेवर घेण्यात येणार आहे यांची नोंद घ्यावी.
00000
No comments:
Post a Comment