Friday, July 12, 2024

 वृत्त क्र. 585

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा

नांदेड, दि. 12:-  11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त जनऔषधवैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने रांगोळी व पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीचे दु्ष्परिणाम आणि लोकसंख्येचे नियंत्रण याची जनजागृती करणारे संदेश देण्यात आले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण , डॉ. प्रकाश गट्टाणी, डॉ. आर.डी. गाडेगर, डॉ. आय.एफ. इनामदार, मेट्रन अलका जाधव, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख , पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी  तसेच रुग्णालायातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती.

लोकसंख्या वाढीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, मानवी संसाधनाची दिवसेंदिवस वाढत जाणारी कमतरता, ज्यामुळे मानवी जीवनमानाचा स्तर खालावत जावून त्याचा सामान्य नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण व सर्वागिण विकासावर होणारा वितरीत परिणाम यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रत्येकाकडून जनजागृती अधिक प्रभावीपणे करण्याची आवश्यकता असल्याचे मत अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमूख यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रकाश गट्टाणी यांनी केले. यावेळी त्यांनी लोकसंख्या वाढीची कारणे यावर भर दिला जसे कमी वयात लग्न लावणे, निरक्षरता, लिंगभेद, कुटुंब नियोजनाचा अभाव इत्यादी कारणामुळे आज लोकसंख्या वाढीचा आलेख हा उर्ध्वगामी दिसून येतो असे त्यांनी सांगितले. लोकसंख्या वाढीवर शासन स्तरावरुन तसेच नागरिकांनी व्यक्तीगत स्तरावरुन नियंत्रण आणण्यासाठी उपलब्ध शासनाच्या योजना आणि कार्यरत यंत्रणा यांच्या सहाय्याने प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. संतोष  जोगदंड तर आभार डॉ. सुष्मिता वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जन औषधवैद्यकशास्त्र विभागाच्य डॉ. सुष्मिता वाघमारे, डॉ. ज्योती भिसे, समाज सेवा अधीक्षक गजानन वानखेडे, सार्वजनिक आरोग्य परिचारिका ममता उईके, निवासी डॉक्टर्स, आंतरवासिता विद्यार्थी आदींनी परिश्रम घेतले.

00000



No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...