Thursday, April 20, 2017

खरीप हंगामातील बियाणे, खतांसाठी
काटेकोर नियोजन करावे - पालकमंत्री खोतकर
नांदेड दि. 20 :- शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात उत्तम दर्जाचे बियाणे, रासायनीक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी वेळीच काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे खरीप हंगाम-2017 जिल्हास्तरीय पूर्व तयारी आढावा बैठक खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर व उपाध्यक्ष समाधान जाधव, खासदार राजीव सातव, खासदार डॅा. सुनील गायकवाड, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, प्रताप पाटील-चिखलीकर, वसंतराव चव्हाण, सुभाष साबणे, हेमंत पाटील, प्रदीप नाईक, डॅा. तुषार राठोड, नागेश पाटील आष्टीकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती दत्तू रेड्डी, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, कृषि विकास अधिकारी पंडीतराव मोरे, आत्माचे संचालक एस. व्ही. लाडके, मोहिम अधिकारी श्री. हांडे आदी उपस्थित होते. 
जिल्ह्यातील येत्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या बियाणे, खतांचा आढावा घेऊन श्री. खोतकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुरवठा झाला पाहिजे. त्यामध्ये कोणतीही कमतरता भासू नये. पीक कर्ज वितरणामध्येही अडचण येऊ नये असे नियोजन करावे. पीक कर्ज वितरण व शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठनही करण्यात यावे, असेही श्री. खोतकर यांनी सांगितले.  
प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी नांदेड जिल्ह्याच्या येत्या खरीप हंगामासाठी कृषि विभागाने केलेल्या नियोजनाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. नांदेड जिल्ह्यात येत्या खरीप हंगाम 7 लाख 72 हजार 575 हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत करण्यात आले आहे. गतवर्षापेक्षा यावर्षी अधीक क्षेत्रावर पेरणीचे उद्दीष्ट ठरविले आहे. ज्वारी- 70 हजार हेक्टर, तूर- 78 हजार हेक्टर, सोयाबीन- 2 लाख 83 हजार हे., कापूस 2 लाख 65 हजार हे. व इतर पिके 76 हजार 575 हे. क्षेत्रावर पेरणीचे उद्दीष्ट असून त्यासाठी लागणारे 1 लाख 15 हजार 598 क्विंटल बियाणे तर कापूस बियाण्याचे 13 लाख 50 हजार पाकिटे महाबीज व खाजगी कंपन्यांकडून उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रासायनीक खताची 2 लाख 58 हजार 100 मे. टन  मागणी असताना 2 लाख 85 हजार 700 मे. टन खते उपलब्ध होणार आहेत. मागील रब्बीतील 78 हजार 500 मे. टन शिल्लक आहेत. त्यामुळे बियाणे व खताची टंचाई भासणार नाही. सन 2016-17 च्या खरीप हंगामामध्ये पीक कर्जाचे 90.19 टक्के वितरण करण्यात आले होते. तर 2017-18 मध्ये 1925.28 कोटी पीक कर्ज वितरणाचे उद्दीष्ट आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित लोकप्रतिनींधीनी सहभाग घेतला. यावेळी कृषी विभागाच्या विविध पत्रिका, माहिती पुस्तिकांचेही पालकमंत्री श्री. खोतकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...