Thursday, April 20, 2017

जलयुक्त शिवार अभियानातील कामांना गती द्यावी
– पालकमंत्री खोतकर
जिल्हा वार्षिक योजनेतील निधीच्या काटेकोर विनियोगाचे निर्देश

नांदेड दि. 20 :- जलयुक्त शिवार अभियान सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत व अभियानातील कामांना गती द्यावी, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून श्री. खोतकर बोलत होते. बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेच्या 2017-18 च्या प्रारूप आराखड्यासही मान्यता देण्यात आली. या आराखड्यातील कामांबाबत लोकप्रतिनीधींना विश्र्वासात घेऊन वेळोवेळी सुधारीत कामेही प्रस्तावित करण्यासही श्री. खोतकर यांनी निर्देशित केले.
जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॅा. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनातील मुख्य सभागृहात बैठक संपन्न झाली. बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर, खासदार राजीव सातव, खासदार डॅा. सुनील गायकवाड, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, प्रताप पाटील-चिखलीकर, वसंतराव चव्हाण, सुभाष साबणे, हेमंत पाटील, प्रदीप नाईक, डॅा. तूषार राठोड, नागेश पाटील आष्टीकर, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांच्यासह, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य,  जिल्हा परिषद, कृषि, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, शिक्षण, महावितरण यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती.
बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री खोतकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील विविध बाबींचा सर्वंकष आढावा घेतला. जलयुक्त शिवार अभियानाच्या चर्चेच्या अनुषंगाने ते म्हणाले की, हे अभियान सरकारच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी आहे. त्यामुळे सर्वच यंत्रणांनी समन्वयाने अभियानात निवडलेल्या गावांत पुर्ण क्षमतेने कामे करावीत. त्यासाठी लोकसहभागही वाढवावा व कामांना गती द्यावी. कामे दर्जेदार आणि वेळेत व्हावीत असेही त्यांनी सांगितले.
यावेळी टंचाई आराखड्याच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेत आमदार चिखलीकर यांनी कंधार लोहा परिसरात जलयुक्तची कामे उत्कृष्ट झाल्याने यंदा टंचाईची परिस्थितीची तीव्रता जाणवत नसल्याचे सांगितले तसेच आमदार साबणे यांनीही देगलूर परिसरात उत्कृष्ट कामे झाल्याचे नमूद केले. जलयुक्तच्या कामांमुळे अजूनही टँकर सुरू करावे लागले नाही. यात जिल्हा प्रशासन आणि अभियानातील कार्यान्वयन यंत्रणांनी उत्कृष्ट कामे केल्याचे नमूद करून, त्यांनी अभिनंदनाचा ठरावही मांडला.
पालकमंत्री खोतकर यांनी आगामी टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांचाही सविस्तर आढावा घेतला. यात त्यांनी मागणी झाल्यास तातडीने टँकर सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात यावी, विंधन विहीरींचे सर्वेक्षण तातडीने पुर्ण करण्यात यावे, जिल्ह्यातील कोल्हापूरी बंधाऱ्यांसाठी वैजापूर पद्धतीचे गेट बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करावेत, नदी पुनरूज्जीवनासाठीचे प्रस्ताव तयार करावेत अशा सूचनाही दिल्या. बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या गत बैठकीच्या इतिवृत्तातील अनुपालन अहवाल, जिल्हा वार्षिक योजनेच्या 2016-17च्या झालेल्या खर्चास, तसेच त्यातील पुनर्विनियोजनास, सन 2017-18च्या आराखड्यास मान्यताही देण्यात आली.
आयत्या वेळच्या विषयात जिल्ह्यातील रस्ते विकास, तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतही बैठकीत सर्वंकष चर्चा झाली. याशिवाय तीर्थस्थळ विकास, पर्यटन विकास, महावितरण, पथदिवे, तूर खरेदी केंद्र तसेच महानगरपालिका क्षेत्रातील कचरा उठाव, सांसद आदर्श ग्राम, आमदार आदर्श ग्राम योजनांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री श्री. खोतकर यांनी सर्वच कार्यान्वयन यंत्रणांना दरमहा कार्य अहवाल तसेच योजनेतील निधीच्या खर्चाबाबत तसेच त्याच्या विनीयोगाबाबत वेळेत अहवाल देण्याचे निर्देशीत केले. यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित लोकप्रतिनिंधीसह, समितीच्या सदस्यांनी उपयुक्त सूचना केल्या.
जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी बैठकीचे संयोजन केले. प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिनगारे यांनी जिल्ह्याचा टंचाई आराखडा व त्यातील विविध उपाय योजनांबाबतही माहिती दिली.

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...