Thursday, April 20, 2017

पत्रकार संरक्षण कायद्यामुळे सत्य मांडण्याचे बळ
– पालकमंत्री खोतकर
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे खोतकर यांचा हृदय सत्कार
नांदेड दि. 20 :- पत्रकारितेसमोर लोकांसमोर सत्य मांडण्याचे दायित्त्व असते. हे दायित्त्व निभाविण्यासाठीचे बळ पत्रकार हल्ला विरोधी कायद्यातून मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री अर्जून खोतकर यांनी आज येथे केले. राज्य सरकारने पत्रकारांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी पारित केलेला पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला आहे. सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी तसेच अभिनंदन करण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती नांदेड अंतर्गत जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांच्यावतीने पालकमंत्री श्री. खोतकर यांचा हृदय सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पालकमंत्री श्री. खोतकर बोलत होते.
नांदेड येथील मिनी सह्याद्री शासकीय विश्रामगृहातील सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी आमदार हेमंत पाटील, आमदार नागेश पाटील-आष्टीकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार आदींही उपस्थिती होते.
पालकमंत्री श्री. खोतकर म्हणाले की, पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता, राज्याच्या हिताकरिता आणि विकासाची दीशा दाखविण्यासाठी लेखणीच्या माध्यमातून काम करीत असतात. जगात भारतीय पत्रकारितेचे एक आगळे महत्त्व आहे. त्यामुळेच या पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनही ओळखले जाते. यातून नेतृत्त्वालाही दीशा देण्याची पत्रकारितेने भुमिका बजावली आहे. पत्रकार सामान्यांच्या न्याय्यासाठी लढा देत असतात. यातूनच प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधींनाही धोरणे आखता येतात. त्यामुळेच सरकार म्हणून पत्रकारांना संरक्षण देण्याची जबाबदारी येते. सत्य असेल, ते लोकासमोर मांडण्याचे दायित्त्व पत्रकारितेकडे येते. हे दायित्त्व पार पाडण्यासाठीचे बळ या संरक्षण कायद्यामुळे मिळेल, असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री. खोतकर यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस सरकारने पत्रकारांच्या कल्याणासाठी अनेकविध प्रयत्नही केल्याचे नमूद केले. तसेच या सत्काराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनाही अवगत केले जाईल, असे सांगितले.
विविध पत्रकार संघटनांच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन पालकमंत्री श्री. खोतकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमात पत्रकार सर्वश्री किरण कुलकर्णी, नंदकुमार कांबळे, कमलाकर बिराजदार, विश्र्वनाथ देशमुख, भास्कर धम्मा, अब्दूल सत्तार, रुपेश पाडमुख, कालिदास जहागिरदार आदींच्या हस्तेही सत्कार झाला. सुरवातीला पत्रकार विजय जोशी यांनी प्रास्ताविक केले व आभारही मानले. यावेळी विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार आदी उपस्थित होते.       
000000    

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...