Thursday, November 3, 2016

विधान परिषद निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे
काटेकोर पालन व्हावे –निरिक्षक डॅा. पाटील
नांदेड, दि. 3 :-  विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, तसेच मतदारांना प्रभावित करणाऱ्या गैरप्रकार, संशयास्पद आर्थिक व्यवहार यांच्याबाबत विविध यंत्रणांनी समन्वयाने कारवाई करावी , असे निर्देश नांदेड स्थानीक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील यांनी आज येथे दिले. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी विविध यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. त्या बैठकीत डॅा. पाटील बोलत होते.
 बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, अप्पर पोलीस अधीक्षक संदिप डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल काळभोर, उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, आयकर विभागाच्या सहायक आयुक्त वृंदा मतकरी, अग्रणी बँके जिल्हा व्यवस्थापक बी. यु. वाघमारे आदींची उपस्थिती होती.
भारत निवडणूक आयोगाकडून विधानपरिषदेच्या नांदेड प्राधिकारी स्थानिक मतदार संघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणूक कार्यक्रमाच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध शासकीय विभागाचे प्रमुख, यंत्रणा आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
 आज झालेल्या बैठकीत निवडणूक निरिक्षक डॅा. पाटील यांनी विविध  यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. मतदारांची संख्या मर्यादीत असली तरीही या निवडणुकीसाठी सर्वच यंत्रणांनी निवडणूक कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. उमेदवार आणि मतदार यांची संख्या अन्य निवडणुकीच्या तुलनेने मर्यादित असल्याने, उमेदवार व मतदार यांच्यातील थेट संपर्क राहतो. त्यामुळे याबाबत सतर्क राहून, गैर प्रकाराबांबत वेळीच कारवाई करावी. निवडणुकीत शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी जिल्हा आणि लगतच्या राज्याशी संबंधित सीमारेषांवरील तपासणी चौक्यांवर चोख व्यवस्था ठेवण्यात यावी, आचार संहिता भंग झाल्यास संबंधितावर तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशा सुचनाही डॅा. पाटील यांनी दिल्या.
निवडणूक  निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनीही निवडणूक काळातील बॅनर-पोस्टर, सभा, रॅली, उमेदवारांची कार्यालये याबाबत विहीत पद्धतीने रितसर परवानगी देण्याबाबत तसेच अवैध प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. आचारसंहिता कक्ष, भरारी पथकांशी समन्वय, अवैध मद्य विक्री  व वाहतूक याबाबत तपासणी नाक्यांवर सज्जता ठेवावी याबाबतही सूचना केल्या.
आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्ष
जिल्ह्यात  निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू असल्याने, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीची नोंद घेण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा 1077 हा दुरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.

00000000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...