Thursday, November 3, 2016

एसएमएसद्वारे धान्य वितरणाची माहिती देणाऱ्या
ईपीडीएस प्रणालीचे उद्घाटन, राज्यातील पहिलाच उपक्रम
नागरिकांना नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी काकाणी यांचे आवाहन
नांदेड, दि. 3 :- अन्‍न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पुरवठा विभागाच्या धान्य व शिधापत्रिकावरील वस्तुंच्या उपलब्धता- पुरवठा विषयक माहितीसाठीची EPDS SMS GATEWAY या अत्याधुनिक प्रणालीचे आज जिल्‍हाधिकारी सुरेश काकाणी यांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. राज्यात नांदेड जिल्ह्याने ही प्रणाली कार्यान्वीत करण्याचा पहिला उपक्रम यशस्वी केला आहे.
या प्रणालीमध्‍ये रास्‍त भाव दुकानदार व गावातील पदाधिकारी व सामान्‍य लाभधारक यांच भ्रमणध्‍वनी क्रमांक एकत्र करून गट तयार करण्यात आले आहेत. या गटातील सदस्यांना ग्रुप मेसेंजींगद्वारे त्‍यांच्‍या गावातील रास्‍त भाव दुकानदार यांना त्या-त्या माहिन्यात मंजुर करण्‍यात आलेले धान्‍य, संबंधीत दुकानदाराने शासकीय गोदामातुन उचलेले धान्‍य, त्याचे प्रमाण, दिनांक, वाहन क्रमांक व वेळ याबाबतची इत्यंभूत माहिती EPDS SMS GATEWAY प्रणालीतील SMS पाठविण्‍यात येते. तालुक्यातील शासकीय गोदामांच्या गोदामपाल यांच्‍या मार्फत ही प्रक्रिया राबविण्‍यात येत आहे.
या प्रणालीच्या उद्घाटनप्रसंगी जिल्‍हाधिकारी श्री. काकाणी यांनी नांदेड तालुक्यातील रास्‍त भाव दुकानदार तुकाराम गजभारे मौ. बळीरामपुर दुकान क्र.3 यांच्‍याशी संबंधीत 25 सदस्यांच्या गटास एक क्लिकद्वारे SMS पाठविला. या प्रणालीचा उपयोग सर्व गावातील अन्‍नसुरक्षा योजनेतील लाभधारक यांना वेळीच माहिती मिळण्‍यासाठी मदत होईल. त्यामुळे पुरवठा यंत्रणेत पारदर्शकता निर्माण होईल असे नमुद करुन जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी जिल्‍ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी संबंधीत तहसिल कार्यालयात जाऊन  या  प्रणालीमध्‍ये नाव नोदणी करुन घ्‍यावी असे आवाहन केले.  जिल्‍हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी प्रास्ताविकात नागरीकांना पुरवठा विभागाशी निगडीत माहितीसाठी व मदतीसाठी Online SMS Gateway या प्रणालीसाठी व तक्रारीसाठी  1967 आणि 1800224950 हे निशुल्क दुरध्वनी क्रमांकही उपलब्‍ध असल्‍याचेही यावेळी सांगितले. 
सहायक पुरवठा अधिकारी सौ. संतोषी देवकुळे, नांदेडचे तहसिलदार पी.के. ठाकूर, जिल्हा पुरवठा निरिक्षण अधिकारी एम.एम.काकडे,तांत्रिक अधिकारी कुलदीप जे.जोशी, नायब तहसिलदार, गोदामपाल, आदींची उपस्‍थीती होती. श्री. काकडे यांनी सुत्रसंचालन केले, तर नायब तहसिलदार विजय चव्‍हाण यांनी आभार मानले.  

0000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र. 1133 नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत  भाजपचे 5, शिवसेनेचे 3 तर राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी  नां...