नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या
निवडणुकीत काँग्रेसचे राजुरकर विजयी
मतमोजणी शांततेत व सुरळीत संपन्न
नांदेड,
दि. 22 :- महाराष्ट्र
विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय
राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अमरनाथ अनंतराव राजुरकर यांना विजयी घोषित करण्यात
आले. निवडणुकीतील मतदानाची मतमोजणी आज येथे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत
भवन येथे पार पडली. मतमोजणीनंतर श्री. राजूरकर यांनी आवश्यक मताधिक्य मिळवत विजय
संपादन केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी
जाहीर केले. यावेळी निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील उपस्थित होते.
नांदेड
विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार अमरनाथ
अनंतराव राजुरकर व अपक्ष उमेदवार श्यामसुंदर दगडोजी शिंदे असे दोन उमेदवार होते.
निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 472 पैकी 471
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मतमोजणी आज बचत भवन येथे कडेकोट
बंदोबस्तात तसेच शांततेत व सुरळीत पार पडली.
मतमोजणीपुर्वी
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी मतमोजणीच्या
प्रक्रियेबाबत मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांना निर्देश दिले. यावेळी दोन्हीही
उमेदवार तसेच त्यांचे मतमोजणी प्रतिनीधीही उपस्थित होते. तीन टेबलवर मतमोजणी
अधिकारी, सहायक अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणीत 459
मते वैध ठरली. त्यापैकी अमरनाथ राजूरकर यांना 251 मते मिळाली. तर श्यामसुंदर शिंदे
यांना 208 मते मिळाली. मतमोजणीत 12 मते अवैध ठरविण्यात आली.
मतमोजणीनंतर
निवडणूक निर्णय अधिकारी श्री. काकाणी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार
यांना विजयी घोषित केले. विजयी उमेदवार श्री. राजूरकर यांना निवडणूक निर्णय
अधिकारी श्री. काकाणी यांच्या हस्ते प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. यावेळी
निवडणूक निरिक्षक डॅा. जगदीश पाटील, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्यासह मतमोजणी
प्रक्रियेत सहभागी अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपजिल्हा निवडणूक
अधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, जिल्हा पुरवठा
अधिकारी संतोष वेणीकर, उपजिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, अनुराधा ढालकरी, उपविभागीय
अधिकारी प्रदीप कुलकर्णी आदींसह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यांचीही
उपस्थिती होती.
मतमोजणी
प्रक्रिया तसेच स्थानिक प्राधिकारी निवडणुकीची सर्वच प्रक्रिया शांतता व
सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी तसेच विविध
घटकांचे जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी आभार मानले.
00000
No comments:
Post a Comment