Wednesday, October 31, 2018


6 नोव्हेंबरपासून रंगणार ! बंदा घाटवर दिवाळी पहाट
नांदेडच्या रसिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
नांदेड दि. 31 :- जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, गुरुद्वारा बोर्ड, वाघाळा शहर मनपा व सांस्कृतिक समिती नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेडच्या गोदावरी नदीच्या रम्य तीरावर बंदाघाट येथे दरवर्षी घेतला जाणारा दिवाळी पहाट  हा कार्यक्रम यावर्षी दि. 6, 7, 8 नोव्हेंबरपर्यंत संपन्न होणार आहे. गेल्या काही वर्षापासून बंदाघाट वरील या रम्य दिवाळी पहाट   ची किर्ती दूरवर पसरली आहे. त्यामुळे नांदेड शहरातूनच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील रसिक मंडळी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने जमतात. आतापर्यंत नांदेडच्या दिवाळी पहाट   या कार्यक्रमात राहुल देशपांडे, राजा काळे, हेमा उपासनी, अनुजा वर्तक , अरविंद पिंगळे, त्यागराज खाडीलकर, आरती दिक्षित, पं. ब्रजेश्वर मुखर्जी या दिग्गज कलावतांनी या कार्यक्रमात हजेरी लावलेली आहे.
यावर्षी दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.45 वाजता "गौरव महाराष्ट्राचा" या मालिकेतील विजेती महागायिका सौ. धनश्री (देव) देशपांडे हिच्या संघाची "स्वर दिवाळी" ही सुगम संगीताची सुरेल मैफील सादर होणार असून याच कार्यक्रमात झी सारेगामाचा अंतिम विजेता मयुर सुकळे व उपविजेता अक्षय घाणेकर यांचीही हजेरी लागणार आहे. या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन सुप्रसिध्द निवेदक डॉ. नंदकुमार मुलमुले हे करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता "सांज दिवाळी" साजरी होणार असून या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती निलकंठ पाचंगे यांची आहे. यात सुप्रसिध्द बासरीवादक ऐनोद्दीन वारसी तसेच सुप्रसिध्द तबलावादक  खंडेराव मुळ्ये (उस्मानाबाद) यांची जुगलबंदी सादर होणार आहे. तसेच नव्याने महाराष्ट्रात प्रसिध्द झालेली नांदेडची कन्या गुंजन शिरभाते हिचे व्हायोलीन वादन होणार आहे. त्यानंतर नांदेडचे सुप्रसिध्द नर्तक डॉ. भरत जेठवाणी आणि सुप्रसिध्द नृत्यांगना ईशा जैन व युवा नर्तक अथर्व चौधरी यांचे भरत नाट्यम् व कुच्चीपुडी नृत्य सादर होणार आहे. तसेच प्रथित यश नृत्य सम्राज्ञी व अभिनेत्री शर्वरी जनेनीसची शिष्या व मराठवाड्यातील एकमेव महिला संगितकार आंनदी विकास यांची कन्या भार्गवी देशमुख हिच्या कथ्थक नृत्याचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसिध्द गझलकार बापु दासरी हे करणार असून या कार्यक्रमाचे निर्मितीसाथ पत्रकार विजय बंडेवार यांनी केली आहे.
दुसरे दिवशी दि. 7 नोव्हेंबरला सकाळी 5.45 वाजता कोलकत्याचे सुप्रसिध्द शास्त्रीय गायक पं. ओंकार दादरकर यांची संगीत सभा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात बंदीश, ठुमरी, दादरा व नाट्यगीते अशा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची मेजवाणी रसिकांना मिळणार आहे.
तिसरे दिवशी दि. 8 नोव्हेंबर रोजी गुरुवार "दिवाळी पाडवा पहाट" आयोजित करण्यात आली आहे. या दिवशी पहाटे 5.45 वाजता सुप्रसिध्द निवेदक ॲड गजानन पिंपरखेड यांची संकल्पना व निवेदन असलेला "रामप्रहर" हा संगीतकार राम कदम यांनी संगीतबध्द केलेल्या गाण्यावर आधारित कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती पत्रकार विजय जोशी यांची असून डॉ. प्रमोद देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. झी सारेगम फेम योगेश रनमले तसेच औरंगाबादच्या सुप्रसिध्द गायिका सौ. धनश्री सरदेशपांडे सहभागी होत असून नांदेडचे स्थानिक कलावंत, विलास गारोळे, सौ. वर्धिनी जोशी हयातनगरकर, सौ. माधुरी पाटील वाकोडकर व कु. माधवी पाठक हे कलावंत सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, लेखाधिकारी उच्च शिक्षण तथा समन्वयक निलकंठ पाचंगे, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. वाधवाजी तसेच महानगरपालिका आयुक्त लहुराज माळी तसेच प्रसार माध्यम सांभाळणारे प्रजावावणीचे संपादक शंतनू डोईफोडे, पत्रकार विजय जोशी, स्वयंवर प्रतिष्ठानचे सुनिल नेरलकर , रत्नाकर अपस्तंभ आनंदी विकास, हर्षद शहा, वसंत मैय्या, उमाकांत जोशी, सरेश जोंधळे, विजय होकर्णे, लक्ष्मण संगेवार, बापू दासरी, विजय बंडेवार, गिरीश देशमुख आणि ॲड. गजानन पिंपरखेडे यांनी केले आहे.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...