Tuesday, October 30, 2018

लेख



दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण
 कौशल्य विकास योजना
                                               
 अनिल आलुरकर
                                                                                    जिल्हा माहिती अधिकारी,  
                                                                                    नांदेड

ग्रामीण भागातील युवक युवतींना पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला जातो. यावर्षी जवळपास २३ हजार युवक - युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभागामार्फत उमेद अभियानांतर्गत ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी ही माहिती.

ग्रामविकास विभागामार्फत उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील युवक युवतींना पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षण देऊन विविध कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून दिला जातो. यावर्षी जवळपास २३ हजार युवक - युवतींना प्रशिक्षण देऊन कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी अभियानामार्फत प्रकल्प अंमलबजावणी संस्थांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. स्वरोजगार करण्याची इच्छा असणाऱ्या युवक-युवतींना जिल्हास्तरावर लिड बँकांच्या माध्यमातून RSETI या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. बँकांमार्फत त्यांना कर्ज उपलब्ध करून देऊन स्वरोजगार करण्यासाठी सहाय्य केले जाते. 
यामध्ये यावर्षी प्रति जिल्हा ७५० युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन स्वरोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. अभियानात वर्धिनी, प्रेरिका, पशुसखी, कृषी सखी, कृतीसंगम सखी अशा पद्धतीने समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून काम करण्याची संधी दिली गेली आहे. जवळपास २१ हजार स्त्रियांनी याचा लाभ घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. या माध्यमातून प्रशिक्षित आणि कौशल्य विकसित झालेली समुदाय संसाधन व्यक्तींची फळी निर्माण झाली आहे.


स्त्रियांच्या उत्पादनांना बाजारपेठ
उमेद अभियानात जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रदर्शनांचे आयोजन करून स्त्रियांच्या बचतगटातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. बचतगटातील स्त्रियांना पणन कौशल्ये उपलब्ध करून देण्यासाठी उस्मानाबाद, वर्धा, रत्नागिरी जिल्ह्यात केरळ येथील कुटुंब श्री संस्थेच्या मदतीने लघु उद्योग सल्लागार तयार करण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यात गटाच्या वस्तुंची विक्री व व प्रदर्शन करण्यासाठी वर्धिनी सेवा संघामार्फत जिल्हास्तरावर कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बचतगटांना विविध प्रशिक्षण
बचतगटांना फक्त पापड, लोणचे आणि चटण्या यांच्या उत्पादनात अडकवून चालणार नाही. बाजारपेठेची आवश्यकता लक्षात घेऊन बचतगटांनी आपल्या उत्पादनांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे उमेद अभियानांतर्गत आता बचतगटांसाठी शेळीपालन, मत्स्यव्यवसाय, शेती तंत्रज्ञान, कुक्कुटपालन आदींच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. सुमारे १ लाख १२ हजार इतक्या बचतगटांना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शुन्य टक्के व्याजदराने कर्ज
राज्य शासनाने सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत बचतगटांना शुन्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची महत्वाकांक्षी योजना सुरु केली असून राज्यात आतापर्यंत ४ हजार ६६२ बचतगटांना याचा लाभ झाला आहे, या योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ५२ लाख रुपयांचे व्याज अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
राज्यात १ लाख ८१ हजार स्वयंसहाय्यता गट, बचतगट आहेत तर ३ हजार ९५६ ग्रामसंघ काम करीत आहेत. अभियानात सहभागी बचतगटांना आजर्यंत ३ हजार १८७ कोटी रुपये इतक्या रकमेचे कर्ज विविध बँकांमार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. जे गट नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना केंद्र शासनाच्या व्याजावरील अनुदान व राज्य शासनाच्या सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत व्याजावरील अनुदान प्राप्त होते व त्या गटांना प्रभावी शून्य टक्के दराने कर्ज उपलब्ध होते. गटाच्या गरजेनुसार बँकेकडून गटांना कर्ज देण्याची सोय अभियानांतर्गत करण्यात आली आहे. 
---000---

No comments:

Post a Comment

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...