Tuesday, October 30, 2018

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायातून
उत्पन्न वाढविले पाहिजे - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड दि. 30 :- शेतकऱ्यांनी रेशीम, मत्स्यपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन यासारख्या शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्न वाढविले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.  
जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन नांदेड येथील हॉटेल ताज पाटील प्लाझा येथे करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) आर. बी. चलवदे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक तथा कृषि उपसंचालक सौ. एम. आर. सोनवणे, नांदेड उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुगदेव, मार्गदर्शक एनसीडीइएक्सचे अमोल मेश्राम, वामभोरी गर्भगिरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे श्री. चिंधे, पुणे महा. एफपीसीचे प्रशांत पवार, रुप्रोनॉमी कंपनीचे संग्राम नायका, नाशिक देवी नदी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे अनिल शिंदे, विदर्भ को. ऑपरेटीव्ह कंपनीचे वैभव ठाकरे, वैद्यनाथ कृषि विकास मंडळाचे वैजनाथ कराड, पैनगंगा ॲग्रो फुड प्रोसोसिंग इंडस्ट्री व कृषि समर्थ ट्रेनींग कंपनीचे पवनकुमार मोरे, संग्राम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.           
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, शेतमालाला चांगला दर मिळवा यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल स्वच्छ, वाळवून, चाळणी करुन प्रतवारी केल्यानंतर बाजारात आणावा. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात 14 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या असून या कंपन्यांकडे शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री उभी केली आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गट स्थापन करुन कंपन्या स्थापन कराव्यात व आपल्या शेतमालाची थेट विक्री गटामार्फत किंवा कंपनीमार्फत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी केले.  
प्रास्ताविकात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. चलवदे यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्यातील हळद पिकावर प्रक्रिया करुन दर्जेदार हळद पावडर ब्रँडींग व पॅकींग करुन विक्री करावी. जिल्ह्यात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असून मिरचीचे दर्जेदार पावडर करुन विक्री करता येईल. तसेच निर्यातक्षम दर्जेदार केळीचे उत्पादन घेऊन केळी निर्यात तसेच प्रक्रिया करता येईल, असे सांगितले.
या संमेलनात धान्य खरेदी / विक्री व्यवस्थापन, धान्य, भाजीपाला खरेदीदार इतर खरेदीदार ओळख व संवाद, शेतकरी कंपनी व मार्केटिंग या विषयांवर सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे संचालक, सभासद, शेतकरी आदी उपस्थित होते.    
जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या 14 स्थापन करण्यात आल्या असून त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. (कंसात व्यावसायिक प्रस्तावाचा प्रकार) लहानकर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. आंबेगाव / लहान ता. अर्धापूर (प्राथमिक प्रक्रिया - हळद पावडर). पुर्वारेश्वर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी करडखेड ता. देगलूर, बरबडा परीसर ॲग्रो प्रोड्युसर कं. बरबडा ता. नायगाव, धर्माबाद ॲग्रो प्रोड्युसर कंपनी जारीकोट ता. धर्माबाद, श्री गुरु समर्थ रामबापु प्रोड्युसर कंपनी लि. वाळकेवाडी ता. हिमायतनगर, सगरोळी परीसर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. सगरोळी ता. बिलोली, विठ्ठलेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी लि. शहापूर ता. देगलूर, राजे मल्हारराव होळकर ॲग्रो प्रोड्युसर कं. लि. नारनाळी ता. कंधार (धान्य स्वच्छता व प्रतवारी, पॅकींग युनिट). राष्ट्रमाता जिजाऊ ॲग्रो प्रोड्युसर कंपनी रोहिपिंपळगाव ता. मुदखेड, बेंबर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी बेंबर ता. भोकर, योगीराज निवृत्ती महाराज ॲग्रो प्रोड्युसर कंपनी चिंचोली ता. कंधार (भाजीपाला प्राथमिक प्रक्रिया स्वच्छता व प्रतवारी पॅकिंग). भाग्यविधाता शेतकरी प्रोड्युसर कंपनी लि. बारड ता. मुदखेड, तामसा परीसर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. तामसा ता. हदगाव, गुरु गोविंद सिंघजी मनार ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लि. कौठा ता. कंधार (दालमिल) अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. एमएसीपी प्रकल्पांतर्गत शेतकरी समुदायाची उत्पादकता त्यांचा नफा आणि बाजार संपर्क वाढविणे, शेतकरी व बाजार व्यवस्था स्पर्धाक्षम करणे, शेतकऱ्यांसाठी कृषि विस्तार सेवांमध्ये सुधारणा आणि बाजार व्यवस्थेत सुधारणा करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
000000

No comments:

Post a Comment

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...