Tuesday, April 11, 2017

लेख -

नांदेडवासियांसाठी विरंगुळा आणि पर्यावरण
पर्यटनाची संधी : बोंडारचे जैवविविधता उद्यान
नांदेड शहरापासून निळा रोडवर 8 कि.मी. अंतरावर असलेले स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान बोंडार हे पर्यटन स्थळ बनत आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या 10 हेक्टर क्षेत्रावर उद्यान उभारले जात आहे. बोंडार, चिखली, नेरली, चिमेगाव व पुयनी हे पाच गावे उद्यानाच्या दोन ते अडीच कि.मी. परिसरालगत आहेत. शहराबरोबर या परिसरातील नजिकच्या गावातील नागरीक, विद्यार्थी, शिक्षक, निसर्गप्रेमी या उद्यानास आवर्जून भेट देवून जैवविविधतेचा अनुभव व आनंद घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
बोंडार येथे या उद्यानाचे काम सन 2015-2016 मध्ये सुरु करण्यात आले असून सन 2018-2019 मध्ये पूर्ण होणार आहे. परंतू जानेवारी 2016 पासून सुरुवात होवून जवळपास एक वर्षात या उद्यानात विविध प्रजातीच्या वृक्षाची लागवड, लोकासाठी उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा, वृक्ष संवर्धनाची घेतलेली विशेष दक्षता यामुळे वृक्षवाढ ही चांगली होत आहे व निसर्ग प्रेमींना ही पर्वणी ठरत आहे. सुमारे पंचवीस एकर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या जैव विविधता उद्यानात तेरा प्रकारची वने विकसित केली आहेत. तसेच 2.25 टीसीएम क्षमतेचे शेततळे, 80 मीटर्सचा माती नाला बांधही बांधण्यात आला आहे. उद्यानात आँक्सीजन वन, तसेच नक्षत्रवन तसेच विविध फळ, औषधी वनस्पती, सर्वधर्म वृक्ष वन आदीं वने समाविष्ट आहेत.
या उद्यानात सर्वधर्म समभाव वनात एकूण 27 प्रजातीचे 279 वृक्ष, करंज वन, निम वन, ऑक्सीजन वन, डिंक वन, आम्र वन, जांभुळ वन, जांब वन, आवळा वन, बांबू वन, नक्षत्र वन, औषधी वन, बाल उद्यान या बरोबरच दहा प्रकारच्या प्रजातीचे वृक्षाची लागवड केलेले तुळशी वृंदावन यासारखी विविधतेने हे उद्यान नटलेले आहे.
या उद्यानात वृक्ष लागवडी बरोबर भेटी देणाऱ्यासाठी विविध निरिक्षण कुटी, स्वच्छता गृह, पाणी / सिंचन व्यवस्था, आसन व्यवस्था, उर्जा व्यवस्था, पाण्याचे कारंजे, भांडारगृह, स्वच्छता कचरा, रोपे ठेवण्याची व्यवस्था, कॅक्टस गृह, लोखंडीपूल, ध्यानकेंद्र, बालउद्यानात खेळाचे साहित्य, पार्किंग ग्रॉऊड आदी सारख्या विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाच्या बोंडार येथील उद्यानात रोपेही तयार केली जात आहे. मानगा बाबुची शास्त्रीय रोप निर्मितीही केली जाते. रेनट्री, काशीद, वड, पिंपळ, चंदन, आवळा सारख्या 18 प्रजातीच्या वृक्षांची रोपेही तयार केली जातात. त्याची संख्या सुमारे 1 लाख 17 हजार 600 एवढी आहे. सुमारे पंचवीस एकर क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या जैव विविधता उद्यानात तेरा प्रकारची वने विकसित केली आहेत.  
तापमानात झालेली प्रचंड वाढ आणि ऋतुचक्रातील बदल हा जागतीक पातळीवर चिंतेचा विषय बनत आहे. अनियमित पाऊस त्यातून निर्माण होणारी पाणीटंचाई सारख्या समस्या निर्माण होवून लागल्या आहे. अशा परिस्थितीत पृथ्वीतलावरील जीवसृष्टी सुरक्षित रहाण्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धनही काळाची गरज निर्माण झाली आहे. शासन स्तरावर वृक्ष लागवडीच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहे. विविध उपक्रम योजनाच्या आधाराने वृक्ष लागवड व संवर्धन केले जात असतांना त्यात जनतेचाही सहभाग महत्वाचा आहे. वृक्षामधील काही प्रजाती दुर्मिळ होत आहे. त्याची संख्या वाढावी, जैवविविधता टिकावी म्हणून बोंडार येथील जैवविविधता उद्यानाचा सामाजिक वनीकरण विभागाचा हा उपक्रम निश्चित दिशादर्शक आहे.
 - दिलीप गवळी
 जिल्हा माहिती अधिकारी , नांदेड

*********

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...